Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या

प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या

आता नजरा मतदानाच्या २१ ऑक्टोबरकडे

Related Story

- Advertisement -

मागील दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचार शनिवारी संध्याकाळी सहा वाजता थांबला. मागील दोन आठवडे घरोघरी जाणार्‍या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दुचाकीसह मोठ्या रोड-शोच्या माध्यमातून मोठे शक्तीप्रदर्शन केले. आता पुढील २४ तास गुप्त गाठीभेटी, संपर्काचे असणार आहे. मात्र खरी प्रतिक्षा आहे ती सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी होणार्‍या मतदानाची. २१ ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर येत्या गुरुवारी २४ ऑक्टोबरला राज्यभरात मतमोजणी आहे.

शनिवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या मतदार संघात रोड-शोचे आयोजन केले होते. मात्र मुंबईसह परिसरात सकाळपासूनच वरूणराजाने हजेरी लावल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाली. तरीही शेवटच्या काही तासांची प्रचाराची संधी वाया जाऊ नये म्हणून पावसात भिजतच उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी बाईक रोड-शो केला. एकतर पाऊस त्यात उमेदवारांचे रोड-शो यामुळे मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक रस्त्यांवर या रॅलींमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

- Advertisement -

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील उमेदवारांनी माध्यमातून मागील ७ ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासून संपूर्ण मुंबई आणि आसपासचा परिसर राजकीय पक्षांच्या प्रचाराने ढवळून गेला होता. भाजप,शिवसेना, काँग्रेस, राष्ट्वादी काँग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडीसह अन्य पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी पदफेरी तसेच रॅली काढत मतदारांपर्यंत पोहचण्याचा चंग बांधला होता. यंदा भाजप आणि शिवसेनेची महायुती तर काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसची आघाडी झाल्याने यंदा अनेक ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. त्यातच मुंबईत वर्सोव्यात राजुल पटेल, अंधेरी पूर्व मध्ये भाजपचे मुरजी पटेल, वांद्रे पूर्व मध्ये माजी आमदार तृप्ती सावंत आणि घाटकोपर पश्चिममध्ये शिवसेनेचे संजय भालेराव यांनी बंडखोरी केल्यामुळे याठिकाणी शिवसेना विरुध्द भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे बंडखोरांमध्ये परंपरागत निवडून येणार्‍या उमेदवारांच्या उरात धडकी भरली आहे. तर वडाळ्यात भाजप उमेदवार कालिदास कोळंबकर यांचा प्रचारात शिवसेना उतरलेली नाही. विक्रोळीत शिवसेनेचे सुनील राऊत यांच्या प्रचारात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होताना दिसत नाही. तर काही पारंपारिक मतदार संघात एकतर्फी लढत होत असली तरी बहुतांशी मतदार संघात मतपरिवर्तन होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अनेक मतदार संघात निवडणूक लढवणारे विद्यमान आमदार चिंतेत आले आहेत.

- Advertisement -

आजवर विविध मार्गाने प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार्‍या उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या शनिवारी सकाळपासूनच रॅली करत संपूर्ण मतदार संघ ढवळून काढला. पावसाच्या उपस्थितीत दुचाकींच्या माध्यमातून रोड-शो करत उमेदवारांनी प्रचाराचा शेवट करताना मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. उमेदवारांच्या या प्रचाराच्या रॅलीमुळे मुंबईतील अनेक प्रमुख रस्ते तसेच गल्लीबोळांमध्ये वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. सकाळी ८ वाजता सुरु झालेला रोड-शो आणि प्रचारसभा सायंकाळी ६वाजता बंद झाल्या. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा खर्‍या अर्थाने थंडावल्या गेल्या आणि मुंबईकरांचीही या प्रचारातून सुटका झाली.

२८८ जागांवर मतदान
येत्या सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी राज्यात २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे

सातारा लोकसभा पोटनिवडणूक
भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सातार्‍यातून उदयनराजे भोसले हे भाजपमधून लढत आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील मैदानात उतरलेले आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयनराजेंसाठी सातार्‍यात सभा घेतली तर शरद पवार यांनीही श्रीनिवास पाटील यांच्यासाठी सातार्‍यात तीन सभा घेतल्याने या जागेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -