घरमहाराष्ट्रमनसैनिकांना राज ठाकरेंच्या आदेशाची प्रतिक्षा

मनसैनिकांना राज ठाकरेंच्या आदेशाची प्रतिक्षा

Subscribe

लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणूक न लढवताही ‘तांडव’ करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभेत धडाडीची एन्ट्री होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. विधानसभेच्या आधी तीन-चार महिने राज ठाकरे यांनी देशभरातील मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून इव्हीएमच्या विरोधात जो ‘उठाव’ करण्याचा प्रयत्न केला, यावरून राज ठाकरे विधानसभेत राडा घालणार असेही चित्र होते, परंतु अचानक कोहिनूर टॉवर प्रकरणी ईडीकडून राज ठाकरे यांची चौकशी झाली आणि तिथपासून कृष्णकुंज शांत आहे.

सध्या युती, आघाडीची चर्चा रंगात आहे, सर्व राजकीय पक्ष इलेक्शनच्या मोडमध्ये आले आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून अजून मनसैनिकांना कोणताही आदेश आलेला नाही. तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मनसेला आघाडीत घेणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या भूमिकेला दुजोरा दिला, त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, याविषयी मनसैनिकांना उत्सूकता लागली आहे.

- Advertisement -

सध्या मनसे द्विधा मनस्थितीत असल्याचे समजते. निवडणूक लढवावी, असे म्हणणारा एक गट आहे तर निवडणूक लढवू नये, असे म्हणणारा दुसरा गट आहे. या दोन भूमिकांच्या कात्रीत राज ठाकरे अडकले आहेत. निवडणूक लढण्यासाठी उत्सूक असलेल्या गटाने तयारीही सुरू केली आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी स्वीकारलेले मौन हे मनसैनिकांच्या मनाची घालमेल वाढवत आहे. राजकारणात बॅकफूटला आल्यानंतर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उभारी घेतली होती. त्यांनी पक्षाला एक भूमिका देवून त्याप्रमाणे सभाही घेतल्या. मोदी-शहा विरोध या भूमिकेमुळे राज ठाकरे यांना केवळ राज्यातच नव्हे,तर देशपातळीवर पोहोचवले.

मनसैनिकही राज ठाकरे यांच्या भूमिकेचा स्वीकार करत उघडउघडपणे मोदी विरोध करू लागले. सोशल मिडीया असो किंवा रस्त्यांवर बॅनरबाजी मनसैनिक बिनदिक्कतपणे मोदी विरोध प्रकट करू लागले. मनसैनिकांमध्ये राज ठाकरे यांनी यानिमित्ताने उत्साह निर्माण केला, मात्र त्यानंतर पुन्हा राज ठाकरे यांनी जुनीच चूक केली. उत्साही कार्यकर्त्यांना कोणताही कार्यक्रम दिला नाही. कार्यकर्ते सक्रीय राहतील, याकरता त्यांच्याशी संवाद साधला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच ३-४ महिने सोडल्यानंतर आता एकजात सर्व मनसैनिक अक्षरश: थंडावले आहेत. कालपर्यंत राज ठाकरे यांच्या भूमिकेचे जोरकसपणे प्रसंगी हमरीतुमरीला येऊन समर्थन करणारे मनसैनिक आज राज ठाकरे यांच्यावर कितीही टिका केली तरी निमूटपणे ऐकून घेत आहेत, हेच हा पक्ष पुन्हा निष्क्रीय बनल्याचे द्योतक आहे.

- Advertisement -

राज ठाकरे आणि कल्पकता हे समीकरण आहे. राज ठाकरे करतील ते हटके असेल, असे बोलले जाते. त्यांच्यातील कलाकारवृत्ती ही इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत थोडी प्रभावी असते. म्हणून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणूक न लढवताही मनसेचे नाव राजकीय पटलावर पुन्हा ठळकपणे कोरण्याचा प्रयत्न केला. मोदी-शहा विरोध करण्याची भूमिका घेत त्यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ ही प्रचाराची थीम आणली आणि अवघ्या महाराष्ट्रात हैदोस घातला. भाजपला बरीच डोकेदुखी निर्माण केली. प्रत्येक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वीच्या भाषणातील ‘नेमक्या’ आशयाचा व्हिडिओ दाखवून त्यावर पोलखोल करण्याच्या पद्धतीने भाजपचा जनाधार घटणार का, अशी शक्यता निर्माण केली होती. त्यामुळे अखेरिस भाजपने प्रचाराच्या शेवटी ‘बघाच तो व्हिडिओ’ हा व्हिडिओ दाखवून राज ठाकरे यांच्या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांच्या या व्हिडिओचा लोकसभेत म्हणावा तितका प्रभाव पडला नाही आणि भाजपला महाराष्ट्रात लोकसभेत भरघोस यश मिळाले.

मनसेला हा मोठा सेटबॅक होता, तरी यानिमित्ताने राज ठाकरे यांनी मनसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसे सक्रिय सहभाग घेईल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. लोकसभेत मनसेसोबत आघाडी केली तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेसला फटका बसेल, या भीतीने काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यास विरोध केला, मात्र विधानसभेत मनसेला आघाडीत घेतले जाणार, अशी दाट शक्यता होती, मात्र विधानसभेसाठी मनसेला वगळून आघाडीचे जागा वाटप जवळजवळ निश्चित झाले आहे. यावरून काँगे्रसने मनसेला विधानसभेतही दूर ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे, या विषयीदेखील अद्याप खुलासा झालेला नाही.

अशा सर्व परिस्थितीत आता राज ठाकरे नक्की काय भूमिका घेणार, याची सर्वांना उत्सूकता लागलेली आहे. टप्प्याटप्प्याने सभा घेऊन कार्यकर्त्यांना पुढील दिशादर्शन करणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशी परिस्थिती असताना अद्याप कार्यकर्त्यांसाठी सभा का घेत नाही?, असा प्रश्न पडला आहे. सध्या राज्याच्या राजकारणाचा कॅनव्हास पाहिल्यास, भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आजीमाजी आमदार, खासदार यांना फोडून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने सध्या दोन्ही काँग्रेसची अवस्था बिकट बनली आहे. तर भाजप सर्वच ठिकाणी ताकदवान बनली आहे. अशा परिस्थितीत भाजपविरोधात तेही स्वबळावर निवडणूक लढवणे म्हणजे पैशाचा अपव्यय आहे, अशी सध्या राज ठाकरे यांच्या मनाची धारणा झाल्याचे समजते.

तसेच इव्हीएमच्या सहाय्याने निवडणूक जिंकण्याचे तंत्र विधानसभेतही लोकसभेची पुनरावृत्ती करू शकते, असेही राज ठाकरे यांना वाटत आहे. एका बाजूला अशी नकारात्मक स्थिती आणि दुसरीकडे काँग्रेस आघाडीने नाकारले, तर तिसरीकडे ईडीकडून चौकशी या सर्व परिस्थितीमुळे राज ठाकरे अद्याप इलेक्शन मोडमध्ये येण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे मनसेमध्ये निवडणूक लढवण्याची मागणी करणार्‍या गटाची समजूत कशी घालायची असा यक्ष प्रश्न सध्या राज ठाकरे यांना पडला आहे. मनसेची काही मतदारसंघात चांगली ताकद आहे, त्यामुळे निदान त्या मतदारसंघामध्ये तरी निवडणूक लढवूया, अशी भूमिका या गटाची आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर एकामागो एक निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला तर पक्षाप्रती जनसामान्यांमध्ये नकारात्मक संदेश जाईल, पक्षाचा जनादेश घटेल, कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण होईल, कार्यकर्ते, नेते हे राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी दुसरा पर्याय शोधतील, तसेच कालांतराने पक्षाची मान्यताही रद्द होईल, अशा सर्व सांभाव्य संकटांकडे पाहता मनसेने अस्तित्वासाठी तरी काही मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणूक लढवणे गरजेचे आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -