घरमहा @२८८शिवसेनेच्या पाल‘घरात’ महाआघाडीची कसोटी

शिवसेनेच्या पाल‘घरात’ महाआघाडीची कसोटी

Subscribe

पालघर विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला. 2009 मध्ये काँग्रेसचे राजेंद्र गावीत यांचा अपवाद वगळता शिवसेनेने आपला गड राखण्यात यश मिळवले आहे. विरोधकांकडून बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसचा याठिकाणी दावा आहे. पण, शिवसेनेचे तगडे आव्हान महाआघाडी पेलू शकेल का? हा खरा प्रश्न आहे.

पालघर विधानसभेवर शिवसेनेचाच भगडा फडकत होता. पण, 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावीत यांनी ही परंपरा खंडीत केली. माजी राज्यमंत्री आणि सेनेच्या आमदार मनीषा निमकर यांचा गावीत यांनी पराभव केला. विशेष म्हणजे माजी मंत्री शंकर नम यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली असतानाही गावीत यांनी विजय खेचून आणला. त्यावेळी निमकर यांच्याविरोधात पक्षात प्रचंड नाराजी होती. त्यांच्या उमेदवारीला पक्षातून मोठा विरोध होत होता. पण, त्याकडे दुर्लक्ष करीत मातोश्रीने निमकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त करीत निमकरांना पराभूत करण्यात मोठी भूमिका बजावली होती.

- Advertisement -

2014 च्या निवडणुकीत मात्र सेनेने पालघर पुन्हा काबिज केले. तत्कालीन राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांचा सेनेचे कृष्णा घोडा यांनी अवघ्या 515 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घोडा यांनी बंडखोरी करून सेनेत प्रवेश केला होता. तर सेनेने उमेदवारी नाकारल्याने मनीषा निमकर यांनी बंडखोरी करीत बहुजन विकास आघाडीतून निवडणूक लढवली होती. तर भाजपनेही आपला उमेदवोर मैदानात उतरवला होता. तरीही चौरंगी लढतीत सेनेने विजय मिळवला होता.

आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे 2016 ला पोटनिवडणूक झाली. सेनेने घोडा यांचे पूत्र अमित घोडा यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने उमेदवार न लढवता सेनेला पाठिंबा दिला होता. काँग्रेसमधून राजेंद्र गावीत आणि बविआतून मनीषा निमकर पुन्हा मैदानात उतरले होते. पण, याहीवेळी दोघांना पराभव करीत अमित घोडा विजयी झाले होते. सहानुभूती आणि भाजपचा पाठिंबा यामुळे घोडा यांचे मताधिक्यही वाढले होते. तर दोन्ही माजी राज्यमंत्री पराभूत झाले होते. गावीत सलग दुसर्‍यांदा तर निमकर सलग तिसर्‍यांदा पराभूत झाल्या.

- Advertisement -

यंदाची लढत सेनेला फारशी कठीण नाही. एकतर गावीत स्वतः सेनेचे खासदार आहेत. पण, आमदार घोडा यांच्याबद्दल स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर प्रचंड नाराजी असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. शिवसेनेने जिल्ह्यातील आपल्या वाट्याला आलेल्या चारपैकी तीन ठिकाणचे उमेदवारी जाहीर केले आहेत. पालघरचा निर्णय अद्याप घेतला गेलेला नाही. त्यामुळे घोडा यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वाढली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना शब्द दिल्याने पालघरमधून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर गावीत यांचे निकटवर्तीय डॉ. विश्वास वळवी यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बविआ महाआघाडी कुणाला उमेदवारी देते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. महाआघाडीतून वसईतील तीनही जागा बविआला सोडल्या जाणार आहेत. डहाणू माकप आणि विक्रमगड राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळे किमान पालघरची जागा मिळावी, अशी काँग्रेसजनांनी मागणी आहे. काँग्रेसमधून योगेश नम, मनोहर दांडेकर, मनोज दांडेकर, सिताराम पडवळे इच्छुक आहेत. बविआमधून मनीषा निमकर, विजय तरे, रोहन वेडगा इच्छुक आहेत.

पालघर विधानसभा पोटनिवडणूक
अमित घोडा : (शिवसेना) 68 हजार 181
राजेंद्र गावित : (काँग्रेस ) 48 हजार 181
मनीषा निमकर: (बविआ) 36 हजार 781

शिवसेनेच्या पाल‘घरात’ महाआघाडीची कसोटी
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -