श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी साजरी केली जाते. यंदा 6 सप्टेंबरला कृष्णाष्टमी आणि 7 सप्टेंबर रोजी दही हंडी साजरी केली जाईल. हिंदू पुराणानुसार, श्रीकृष्ण देवांचा जन्म मध्य रात्री झाला होता, त्यामुळे कृष्णजन्माष्टमीचा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो. कृष्णाष्टमीप्रमाणेच दही हंडी देखील भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
का साजरी केली जाते दहीहंडी?
हिंदु पुराणानुसार, कृष्ण भगवान त्यांच्या लहानपणी अनेक बाल लीला करायचे. त्यांना लोणी खूप प्रिय होते. त्यामुळेच ते वृंदावनातील प्रत्येक घरामधून त्यांच्या मित्रांसोबत लोणी चोरून आणायचे आणि खायचे. त्यामुळे त्यांना माखन चोर या नावाने देखील ओळखलं जातं. परंतु कृष्ण लोणी चोरायचे म्हणून वृंदावनातील गोपिका ते लोणी घरामधील उंचवट्यावर ठेवायच्या. जेणेकरून कृष्ण आणि त्यांच्या मित्रांचा हात तिथे पोहोचला जाऊ नये. अशावेळी श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसोबत मिळून पिरॅमिड आकाराचे एकावर एक थर रचायचे आणि त्यावर चढून श्रीकृष्ण हंडी फोडून लोणी खायचे. तेव्हापासूनच दहीहंडीचा उत्सव सुरू झाला.
या राज्यांमध्ये साजरी केली जाते दहीहंडी
महाराष्ट्रात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये पुरूष आणि अनेक महिला देखील सहभाग घेतात. तसेच गुजरातमध्ये देखील मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जाते.