Friday, February 7, 2025
HomeमानिनीReligiousDnyaneshwari Adhyay 13 : वाणी ज्ञानेश्वरांची

Dnyaneshwari Adhyay 13 : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें सबाह्य आपुलें । जेणें गुरुकुळीं वोपिलें ।
आपणपें केलें । भक्तीचें घर ॥
त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर मनादिक व बाह्य इंद्रियादिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहे.
गुरुगृह जये देशीं । तो देशुचि वसे मानसीं ।
विरहिणी कां जैसी । वल्लभातें ॥
ज्याप्रमाणे विरहिणीचे चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरूचे घर असते, तो देश ज्याच्या मनामधे असतो.
तियेकडोनि येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा ।
आड पडे म्हणे घरा । बीजें कीजो ॥
गुरूच्या देशाकडून जो वारा येत असेल, त्या वार्‍याला पाहून त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, आपण माझ्या घरी यावे.
साचा प्रेमाचिया भुली । तया दिशेसीचि आवडे बोली ।
जीवु थानपती करूनि घाली । गुरुगृहीं जो ॥
सद्गुरूविषयीच्या खर्‍या प्रेमाने जो वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेशीच बोलणे आवडते, व जो आपल्या जीवाला गुरूच्या घरात मिरासदार करून ठेवतो.
परी गुरुआज्ञा धरिलें । देह गांवीं असे एकलें ।
वांसरुवा लाविलें । दावें जैसें ॥
परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गाईकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हलता येत नाही, त्याप्रमाणे गुरूची आज्ञा हेच कोणी एक दावे, त्याने देहास बांधून टाकल्यामुळे, त्याला एकट्याला आपल्या गावी राहाणे पडून गुरूच्या गावाकडे धाव घेता येत नाही.
म्हणे कैं हें बिरडें फिटेल । कैं तो स्वामी भेटेल ।
युगाहूनि वडील । निमिष मानी ॥
जो म्हणतो, ही गुरुआज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो गुरु भेटेल? तो (गुरूच्या वियोगात जाणार्‍या) निमिषाला युगाहून मोठे मानतो.
ऐसेया गुरुग्रामींचें आलें । कां स्वयें गुरूंनींचि धाडिलें ।
तरी गतायुष्या जोडलें । आयुष्य जैसें ॥
अशात जर कोणी गुरूच्या गावचे आले अथवा स्वत: गुरूनेच पाठवले तर जसे मरावयास टेकलेल्या पुरूषास आयुष्य प्राप्त व्हावे.

Manini