Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwar - वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar – वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तया अनुरागा वेधु लावीं। एकपत्नीव्रत घेववीं।
क्षेत्रसंन्यासु करवीं। लोभाकरवीं॥
श्रीगुरूच्या प्रेमाला माझा छंद लावीन व त्या प्रेमाकडून एकपत्नी व्रत घेईन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्रसंन्यास करवीन. म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कोठे जाणार नाही असे करीन.
चतुर्दिक्षु वारा। न लाहे निघों बाहिरा।
तैसा गुरुकृपें पांजिरा। मीचि होईन॥
वारा कितीही धावला तरी तो जसा चार दिशांच्या बाहेर निघू शकत नाही, त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला पिंजरा होईन.
आपुलिया गुणांचीं लेणीं। करीन गुरुसेवे स्वामिणी।
हें असो होईन गंवसणी। मीचि भक्तीसी॥
गुरुसेवा जी माझी मालकीण तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन. गुरुभक्तीला मीच गवसणी होईन.
गुरुस्नेहाचिये वृष्टी। मी पृथ्वी होईन तळवटीं।
ऐसिया मनोरथांचिया सृष्टी। अनंता रची॥
गुरूच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन, याप्रमाणे मनोरथांच्या अनंत सृष्टी तयार करतो.
म्हणे श्रीगुरूंचें भुवन। आपण मी होईन।
आणि दास होऊनि करीन। दास्य तेथिंचें॥
तो म्हणतो, गुरूचे राहते घर मी स्वत: होईन व त्यांच्या घराचा चाकर होऊन तेथील चाकरी मीच करेन.
निर्गमागमीं दातारें। जे वोलांडिजती उंबरे।
ते मी होईन आणि द्वारें। द्वारपाळु॥
श्रीगुरू बाहेर जातेवेळी व घरात येतेवेळी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मीच होईन. घराची द्वारे व द्वारांवरील राखण करणारे गडी मीच होईन.
पाउवा मी होईन। तियां मीचि लेववीन।
छत्र मी आणि करीन। बारीपण॥
श्रीगुरूंच्या खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्याचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करेन.
मी तळ उपरु जाणविता। चंवरु धरु हातु देता।
स्वामीपुढें खोलता। होईन मी॥
श्रीगुरूला खालीवर जाणवणारा मीच होईन. त्यांच्यावर चवरी धरणारा मीच होईन. त्यांना हात देणारा मीच होईन व श्रीगुरूपुढे चालणारा वाटाड्या मीच होईन.
मीचि होईन सागळा। करूं सुईन गुरुळां।
सांडिती तो नेपाळा। पडिघा मीचि॥
श्रीगुरूंचा झारी धरणारा शागीर्द मीच होईन व त्यास चूळ भरण्याकरिता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन.
हडप मी वोळगेन। मीचि उगाळु घेईन।
उळिग मी करीन। आंघोळीचें॥
श्रीगुरूला विडा देण्याची सेवा मीच करीन. त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन.

Manini