होईन गुरूंचें आसन। अलंकार परिधान।
चंदनादि होईन। उपचार ते॥
गुरूंचे आसन मी होईन, त्यांचे अंगावर घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र आणि चंदनादी उपचार मीच होईन.
मीचि होईन सुआरु। वोगरीन उपहारु।
आपणपें श्रीगुरु। वोंवाळीन॥
श्रीगुरूंचा स्वयंपाक करणारा मी आचारी होईन व त्यास फराळाचे वाढीन व मी आपल्या आपलेपणाने श्रीगुरूस ओवाळीन.
जे वेळीं देवो आरोगिती। तेव्हां पांतीकरु मीचि पांतीं।
मीचि होईन पुढती। देईन विडा॥
श्रीगुरू जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व भोजन झाल्यानंतर त्यांना मीच पुढे होईन आणि विडा देईन.
ताट मी काढीन। सेज मी झाडीन।
चरणसंवाहन। मीचि करीन॥
श्रीगुरूंचे भोजन केलेले पात्र मीच काढीन व त्यांचा बिछाना मी झाडीन व त्यांचे पाय चेपीन.
सिंहासन होईन आपण। वरी श्रीगुरू करिती आरोहण।
होईन पुरेपण। वोळगेचें॥
मी स्वत: सिंहासन होईन. त्यावर श्रीगुरू बसतील व सेवेचे पुरेपण होईन म्हणजे संपूर्ण सेवा करीन.
श्रीगुरूंचें मन। जया देईल अवधान।
तें मी पुढां होईन। चमत्कारु॥
श्रीगुरूचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन असा चमत्कार करीन.
तया श्रवणाचे आंगणीं। होईन शब्दांचिया अक्षौहिणी।
स्पर्श होईन घसणी। आंगाचिया॥
श्रीगुरूच्या श्रवणरूपी अंगणात असंख्य शब्द मी होईन. त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्शविषय मी होईन.
श्रीगुरूंचे डोळे। अवलोकनें स्नेहाळें।
पाहाती तियें सकळें। होईन रूपें॥
श्रीगुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पाहतील त्या सर्व मीच होईन. त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणांची सेवा करीन.
तिये रसने जो जो रुचेल। तो तो रसु म्यां होईजैल।
गंधरूपें कीजेल। घ्राणसेवा॥
त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणाची सेवा करीन.
एवं बाह्यमनोगत। श्रीगुरूसेवा समस्त।
वेंटाळीन वस्तुजात। होऊनियां॥
याप्रमाणे सर्व वस्तुमात्र मी होऊन श्रीगुरूची सर्व बाह्य सेवा मी व्यापीन, असे त्याचे मनोगत असते.