गुरूतें पक्षिणी करी। चारा घे चांचूवरी।
गुरु तारू धरी। आपण कांस॥
गुरूला पक्षिणी करतो व आपण (पिल्लू बनलेला) तिच्या चोचीतून चारा घेतो. गुरूला पोहणारा करून आपण त्यांच्या कासेला लागतो.
ऐसें प्रेमाचेनि थावें। ध्यानचि ध्यानातें प्रसवे।
पूर्णसिंधु हेलावे। फुटती जैसे॥
ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटामागून लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते.
किंबहुना यापरी। श्रीगुरुमूर्ती अंतरीं।
भोगी आतां अवधारीं। बाह्यसेवा॥
फार काय सांगावे? याप्रमाणे तो गुरुमूर्ती आपल्या अंत:करणात भोगतो. आता त्याची बाहेरील सेवा ऐक.
तरी जिवीं ऐसे आवांके। म्हणे दास्य करीन निकें।
जैसें गुरु कौतुकें। माग म्हणती॥
तर त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरूचे असे चांगले दास्य करीन की जेणेकरून गुरू मला प्रेमाने ‘माग’ म्हणून म्हणतील.
तैसिया साचा उपास्ती। गोसावी प्रसन्न होती।
तेथ मी विनंती। ऐसी करीन॥
तशा खर्या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील, त्यावेळी मी अशी विनंती करीन.
म्हणेन तुमचा देवा। परिवारु जो आघवा।
तेतुलें रूपें होआवा। मीचि एकु॥
मी असे म्हणेन की देवा हा जो तुमचा सर्व परिवार आहे, तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे.
आणि उपकरतीं आपुलीं। उपकरणें आथि जेतुलीं।
माझीं रूपें तेतुलीं। होआवीं स्वामी॥
आणि आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे आहेत, महाराज, तेवढे सर्व मी व्हावे.
ऐसा मागेन वरु। तेथ हो म्हणती श्रीगुरु।
मग तो परिवारु। मीचि होईन॥
असा मी श्रीगुरूला वर मागेन, तेव्हा गुरू हो म्हणतील. मग तो त्यांचा सर्व परिवार मीच होईन.
उपकरणजात सकळिक। तें मीचि होईन एकैक।
तेव्हां उपास्तीचें कवतिक। देखिजैल॥
गुरूंच्या उपयोगी पडणार्या जेवढ्या म्हणून वस्तुमात्र आहेत, त्यापैकी प्रत्येक जेव्हा मी होईन तेव्हा उपासनेचे कौतुक दृष्टीस पडेल.
गुरू बहुतांची माये। परी एकलौती होऊनि ठाये।
तैसें करूनि आण वायें। कृपे तिये॥
श्रीगुरू हे पुष्कळांची आई होऊन राहतील. असे करून त्यांच्या कृपेकडून शपथ वाहीन.