Saturday, February 8, 2025
HomeमानिनीReligiousSaint Dnyaneshwari Adhyay 13 : वाणी ज्ञानेश्वरांची

Saint Dnyaneshwari Adhyay 13 : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

अपेक्षित पावे । तें जेणें तोषें मानवें ।
अनपेक्षिताही करवे । तोचि मानु ॥
इच्छा असलेली एखादी वस्तु मिळाली असता जेवढा संतोष होतो, तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तु प्राप्त झाली असता तिचा आदर करतो.
जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामाये ।
निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ॥
जो मान व अपमान (मनाच्या सारख्या स्थितीने) सहन करतो व सुखदु:खे ही ज्याच्या ठिकाणी सामावली जातात, (सारखी मानली जातात) व निंदा आणि स्तुतीने ज्याचे मनाची स्थिती दोन प्रकारची (सुखाची व दु:खाची) होत नाही.
उन्हाळेनि जो न तपे । हिमवंती न कांपे ।
कायसेनिही न वासिपे । पातलेया ॥
उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाने जो कापत नाही आणि काही जरी प्राप्त झाले तरी जो भीत नाही.
स्वशिखरांचा भारु । नेणें जैसा मेरु ।
कीं धरा यज्ञसूकरु । वोझें न म्हणे ॥
मेरु पर्वत आपल्या शिखराचे जसे ओझे मानीत नाही अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही.
नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती ।
तैसा नाना द्वंद्वीं प्राप्तीं । घामेजेना ॥
ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदु:खादि द्वंद्वे प्राप्त झाली असता जो श्रमी होत नाही.
घेऊनी जळाचे लोट । आलिया नदीनदांचे संघाट ।
करी वाड पोट । समुद्र जेवीं ॥
पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वांचा समावेश करुन घेतो.
तैसें जयाचिया ठायीं । न साहणें काहींचि नाहीं ।
आणि साहतु असे ऐसेंही । स्मरण नुरे ॥
त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही ज्याचे ठिकाणी रहात नाही.
आंगा जें पातलें । तें करूनि घाली आपुलें ।
येथ साहतेनि नवलें । घेपिजेना ॥
जे जे काही सुखदु:खादि भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे, असे तो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो, असा अभिमानाचा पगडा त्याचेवर बसत नाही.

Manini