क्षीरार्णवाचिया कल्लोळीं । कंपु नाहीं मंदराचळीं ।
कां आकाश न जळे जाळीं । वणवियाच्या ॥
क्षीरसमुद्राच्या लाटांनी जसा मंदर पर्वत कापत नाही अथवा आकाश जसे वणव्याच्या जाळाने जळत नाही.
तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मीं ।
किंबहुना धैर्य क्षमी । कल्पांतींही ॥
त्याप्रमाणे शोकमोहादि षडूर्मींच्या लाटा आल्या गेल्या तरी त्याच्या मनोधर्मामधे (चित्तस्थिरतेमधे) गडबड उडत नाही. फार काय सांगावे ? कल्पांतसमय आला तरि तो धैर्यवान सहनशील असतो.
परी स्थैर्य ऐसी भाष । बोलिजे जे सविशेष ।
ते हे दशा गा देख । देखणया ॥
हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचे विशेष वर्णन केले जाते ती हीच अवस्था होय असे समज.
हें स्थैर्य निधडें । जेथ आंगें जीवें जोडे ।
तें ज्ञानाचें उघडें । निधान साचें ॥
हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहे, तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे.
आणि इसाळु जैसा घरा । कां दंदिया हतियेरा ।
न विसंबे भांडारा । बद्धकु जैसा ॥
आणि ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा (आपले धन असलेल्या) घराला विसरत नाही किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही अथवा लोभी पुरुष जसा आपल्या खजिन्याला विसरत नाही.
कां एकलौतिया बाळका- । वरि पडौनि ठाके अंबिका ।
मधुविषीं मधुमक्षिका । लोभिणी जैसी ॥
एकुलत्या एका मुलावर जशी आई पडून रहाते (म्हणजे त्याला कधी विसंबत नाही) अथवा जशी मधमशी लोभी असते.
अर्जुना जो यापरी । अंतःकरण जतन करी ।
नेदी उभें ठाकों द्वारीं । इंद्रियांच्या ॥
अर्जुना याप्रमाणे जो आपल्या अंत:करणाला जपतो व इंद्रियांच्या द्वारात अंत:करणाला उभे राहू देत नाही.