याकारणें गा भक्तराया। हा मंत्र तुवां धनंजया।
शिकिजे जे यया। मार्गा भजिजे॥
याकरिता हे अर्जुना, या भक्तिमार्गाचे आचरण करावे, हा विचार लक्षात ठेव.
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय।
निवसिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः॥
माझ्या ठिकाणी मन वृत्तिवंत करून घाल, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर. म्हणजे तू माझ्या ठिकाणी निवास करशील यात शंका नाही.
अगा मानस हें एक। माझ्या स्वरूपीं वृत्तिक।
करूनि घालीं निष्टंक। बुद्धि निश्चयेंसीं॥
अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव.
इयें दोनीं सरिसीं। मजमाजीं प्रेमेसीं।
रिगालीं तरी पावसी। मातें तूं गा॥
अर्जुना, या दोघांनी जर माझ्यामध्ये प्रवेश केला तर तू मला पावशील.
जे मन बुद्धि इहीं। घर केलें माझ्यां ठायीं।
तरी सांगें मग काइ। मी तू ऐसें उरे?॥
कारण की मन व बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग ‘मी, तू’ असे द्वैत उरेल काय सांग.
म्हणोनि दीप पालवे। सवेंचि तेज मालवे।
कां रविबिंबासवें। प्रकाशू जाय॥
म्हणून पदराच्या वार्याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीच नाहीसे होते अथवा सूर्यास्तावेळी सूर्याच्या बिंबाबरोबर जसा प्रकाश जातो.
उचललेया प्राणासरिसीं। इंद्रियेंही निगती जैसीं।
तैसा मनोबुद्धिपाशीं। अहंकारु ये॥
शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिये जशी त्याच्या मागून जातात, त्याप्रमाणे जिकडे मन व बुद्धी जाईल तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो.
म्हणोनि माझिया स्वरूपीं। मनबुद्धि इयें निक्षेपीं।
येतुलेनि सर्वव्यापी। मीचि होसी॥
म्हणून माझ्या स्वरूपी मन व बुद्धी दोन्ही ठेव. एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील.
यया बोला कांहीं। अनारिसें नाहीं।
आपली आण पाहीं। वाहतु असें गा॥
अर्जुना मी बोललो त्यात अन्यथा काही नाही असे मी आपली शपथ घेऊन तुला सांगतो.