म्हणोनि यावया शांति। हाचि अनुक्रमु सुभद्रापती।
म्हणोनि अभ्यासुचि प्रस्तुतीं। करणें एथ॥
म्हणूनच अर्जुना शांतीकरिता हाच तो क्रम आहे. म्हणून सांप्रतकाळी अभ्यासच केला पाहिजे.
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाद् ध्यानं विशिष्यते।
ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम्॥
अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ आणि नंतर कर्मफलत्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे.
अभ्यासाहूनि गहन। पार्था मग ज्ञान।
ज्ञानापासोनि ध्यान। विशेषिजे॥
अर्जुना, मग अभ्यासापेक्षा ज्ञान खोल आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्त्वाचे आहे.
मग कर्मफलत्यागु। तो ध्यानापासोनि चांगु।
त्यागाहूनि भोगु। शांतीसुखाचा॥
मग कर्मफलत्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफलत्यागापेक्षा शांतीसुखाचा भोग चांगला आहे.
ऐसिया या वाटा। इहींचि पेणा सुभटा।
शांतीचा माजिवटा। ठाकिला जेणें॥
अर्जुना, अशा वाटेने याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला.
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी॥
सर्व भूतांचे ठिकाणी द्वेषरहित मैत्री असणारा कृपायुक्त मी माझेपणारहित सुख व दु:ख समान मानणारा क्षमाशील.
जो सर्व भूतांच्या ठायीं। द्वेषांतें नेणेंचि कहीं।
आपपरु नाहीं। चैतन्या जैसा॥
सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहिला नाही. म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही.
उत्तमातें धरिजे। अधमातें अव्हेरिजे।
हें काहींचि नेणिजे। वसुधा जेवीं॥
उत्तमाचा स्वीकार आणि नीचाचा त्याग करावा हे ज्याप्रमाणे पृथ्वी जाणत नाही.
कां रायाचें देह चाळूं। रंकातें परौतें गाळूं।
हें न म्हणेचि कृपाळू। प्राणु पैं गा॥
किंवा अर्जुना, राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाहीत.
गाईची तृषा हरूं। कां व्याघ्रा विष होऊनि मारूं।
ऐसें नेणेंचि गा करूं। तोय जैसें॥
गाईची तहान भागवू व वाघाला विष होऊन मारू असे करणे पाण्याला ज्याप्रमाणे ठाऊक नसते.