हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाला प्रिय असणाऱ्या अनेक गोष्टी त्यांना अर्पण केल्या जातात. या मध्ये दुर्वांचे देखील महत्व सांगण्यात आले आहे.
बाप्पाला दुर्वा का आवडतात?
पौराणिक कथेनुसार, ऋषी मुनी आणि देवता यांना मायावी अनलासुर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. त्यानंतर अखेर देव गणपतीला शरण गेले आणि देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जुडी गणेशाला खाण्यास दिल्या. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाले होते, म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात. त्यामुळे गणेश पूजेमध्ये दुर्वा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात.
दुर्वा चढवताना करा या मंत्राचा जप
ॐ गणाधिपाय नमः
ॐ उमापुत्राय नमः
ॐ विघ्ननाशनाय नमः
ॐ विनायकाय नमः
ॐ ईशपुत्राय नमः
ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः
ॐ एकदन्ताय नमः
ॐ इभवक्त्राय नमः
ॐ मूषकवाहनाय नमः
ॐ कुमारगुरवे नमः