ऐसिया लघिमा चालतां। कृमि कीटक पंडुसुता।
देखे तरी माघौता। हळूचि निघे॥
अर्जुना, अशा हळूवारपणाने चालताना कृमीकीटक पाहिले तर हळूच माघारी फिरतो.
म्हणे पावो धडफडील। तरी स्वामीची निद्रा मोडैल।
रचलेपणा पडैल। झोती हन॥
तो म्हणतो पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर प्रभूची झोप मोडेल व असलेल्या सुखरूपतेस विक्षेप येईल.
इया काकुळती। वाहणी घे माघौती।
कोणेही व्यक्ती। न वचे वरी॥
या करुणेने मागे परततो व कोणत्याही व्यक्तीवर पाय ठेवत नाही.
जीवाचेनि नांवें। तृणातेंही नोलांडवे।
मग न लेखितां जावें। हे कें गोठी॥
गवताच्या काडीत जीव आहे असे समजून ती ओलांडत नाही, मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो तुडवत जाईल ही गोष्ट कुठली?
मुंगिये मेरु नोलांडवे। मशका सिंधु न तरवे।
तैसा भेटलियां न करवे। अतिक्रमु॥
मुंगीला ज्याप्रमाणे मेरू पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिलटाला समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्याने उल्लंघन करवत नाही.
ऐसी जयाची चाली। कृपाफळी फळा आली।
देखसी जियाली। दया वाचे॥
अहिंसकाचे बोलणे याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फळांनी फळाला आली व जेथे वाचेमध्ये दया जगलेली तू पाहशील.
स्वयें श्वसणेंचि सुकुमार। मुख मोहाचें माहेर।
माधुर्या जाहले अंकुर। दशन तैसे॥
स्वत: श्वासोच्छवास नाजूक रीतीने करतो, त्याचे मुख प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे मधुरपणाला अंकुरच फुटलेत.
पुढां स्नेह पाझरे। माघां चालती अक्षरें।
शब्द पाठीं अवतरे। कृपा आधीं॥
पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात. कृपा आधी प्रगट होते व शब्द मागून प्रगट होतात.
तंव बोलणेंचि नाहीं। बोलों म्हणे जरी कांहीं।
तरी बोल कोणाही। खुपेल कां॥
त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर काही कोणाशी बोलू म्हणेल तर आपले बोलणे कोणाला खुपेल का, अशी शंका मनात येते.
बोलतां अधिकुही निघे। तरी कोण्हाही वर्मीं न लगे।
आणि कोण्हासि न रिघे। शंका मनीं॥
बोलताना काही जास्त बोलणे झाले तर ते कोणाच्या वर्मी लागणार नाही ना? आणि त्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना?