Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीReligiousSaint Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Saint Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

उगमींचि वाळूनि जाये। तें वोघीं कैचें वाहे।
जीवु गेलिया आहे। चेष्टा देहीं?॥
मनाचा मनपणा नाहीसा होईल त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्मे राहतात. ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हलणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते.
तैसें मन हें पांडवा। मूळ या इंद्रियभावा।
हेंचि राहटे आघवां। द्वारीं इहीं॥
त्याप्रमाने मन हे सर्व इंद्रियांच्या व्यापारात मूळ आहे व हेच सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागते.
परी जिये वेळीं जैसें। जें होऊनि आंतु असे।
बाहेरी ये तैसें। व्यापाररूपें॥
परंतु ज्यावेळेला जसे वासनेच्या रूपाने मन आंत होऊन असते, तसेच ते इंद्रियांच्या व्यापाररूपाने बाहेर येते.
यालागी साचोकारें। मनीं अहिंसा थांवे थोरें।
पिकली द्रुती आदरें। बोभात निघे॥
ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर येतो, त्याप्रमाणे मनात अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रियव्यापारातून दिसते.
म्हणौनि इंद्रियें तेचि संपदा। वेचितां हीं उदावादा।
अहिंसेचा धंदा। करितें आहाती॥
म्हणून इंद्रिये असलेल्या त्याच अहिंसारूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतात.
समुद्रीं दाटे भरितें। तैं समुद्रचि भरी तरियांते।
तैसें स्वसंपत्ती चित्तें। इंद्रियां केलें॥
समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे जसा समुद्रच भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो, त्याप्रमाणे चित्तच सर्व इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकते.
हें बहु असो पंडितु। धरुनि बाळकाचा हातु।
वोळी लिही व्यक्तु। आपणचि॥
फार बोलणे राहू दे. पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो.
तैसें दयाळुत्व आपुलें। मनें हातापायां आणिलें।
मग तेथ उपजविलें। अहिंसेतें॥
त्याप्रमाणे मनाने आपले दयालुत्व हातापायास आणिले मग तेथे मनानेच अहिंसेला उत्पन्न केले.
याकारणें किरीटी। इंद्रियांचिया गोठी।
मनाचिये राहाटी। रूप केलें॥
म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले.
ऐसा मनें देहें वाचा। सर्व संन्यासु दंडाचा।
जाहला ठायीं जयाचा। देखशील॥
याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल.
तो जाण वेल्हाळ। ज्ञानाचें वेळाउळ।
हें असो निखळ। ज्ञानचि तो॥
तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्ती होय.

Manini