कां संवचोरा चुकवितां । दिवस लागलिया माता ।
कोपावें कीं जीविता । जिताणें कीजे? ॥
अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी येण्यास मुलाला जास्त दिवस लागले तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून मीठमोहर्या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी!
परी यावरील हें नव्हे । तुम्हीं उपसाहिलें तेंचि बरवें ।
आतां अवधारिजो देवें । बोलिलें ऐसें ॥
परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे (शाबासकी देण्यासारखे) नाही, तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले हे म्हणणेच बरे. तर आता महाराज, ऐका. देव असे बोलले.
म्हणे उन्मेखसुलोचना । सावध होईं अर्जुना ।
करूं तुज ज्ञाना । वोळखी आतां ॥
भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तमदृष्टी असणार्या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा उत्तम परिचय करून देतो, तू इकडे लक्ष दे.
तरी ज्ञान गा तें एथें । वोळख तूं निरुतें ।
आक्रोशेंवीण जेथें । क्षमा असे ॥
तर जेथे चरफडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे, हे तू पक्के ओळख.
अगाध सरोवरीं । कमळिणी जियापरी ।
कां सदैवाचिया घरीं । संपत्ति जैसी ॥
फार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल (विपुल वाढतात) अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ति (अलोट येत असते).
पार्था तेणें पाडें । क्षमा जयातें वाढे।
तेही लक्षे तें फुडें । लक्षण सांगों ॥
अर्जुना त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणांपासून कळते, ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो.
तरी पढियंते लेणें । आंगीं भावें जेणें ।
धरिजे तेवीं साहणें । सर्वचि जया ॥
ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतात, त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो.
त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवांचे मेळावे ।
वरी पडिलिया नव्हे । वांकुडा जो ॥
आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या तापांचे समुदाय आहेत, ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले.