तरी तरंगु नोलांडितु। लहरी पायें न फोडितु।
सांचलु न मोडितु। पाणियाचा॥
तर लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज न मोडू देता.
वेगें आणि लेसा। दिठी घालूनि आंविसा।
जळीं बकु जैसा। पाऊल सुये॥
वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टी ठेवून बगळा जसा पाण्यात पाय घालतो.
कां कमळावरी भ्रमर। पाय ठेविती हळुवार।
कुचुंबैल केसर। इया शंका॥
अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात.
तैसे परमाणु पां गुंतले। जाणूनि जीव सानुले।
कारुण्यामाजीं पावलें। लपवूनि चाले॥
त्याप्रमाणे परमाणूंमध्ये लहान जीव आहेत असे जाणून दयेमध्ये आपली पावले लपवून चालतो.
ते वाट कृपेची करितु। ते दिशाचि स्नेह भरितु।
जीवातळीं आंथरितु। आपुला जीवु॥
तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते, ती दिशाच प्रेमाने भरलेली करतो व प्राण्यांच्या खाली आपला स्वत:चा प्राण अंथरतो.
ऐसिया जतना। चालणें जया अर्जुना।
हें अनिर्वाच्य परिमाणा। पुरिजेना॥
अर्जुना, अशा रीतीने जपून ज्याचे चालणे असते त्या चालण्याचे वर्णन करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही.
पैं मोहाचेनि सांगडें। लासी पिलीं धरी तोंडें।
तेथ दांतांचे आगरडे। लागती जैसे॥
जेव्हा मांजर मोहाच्या योगाने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दातांची टोके लागतात.
कां स्नेहाळु माये। तान्हयाची वास पाहे।
तिये दिठी आहे। हळुवार जें॥
अथवा प्रेमळ आई जशी आपल्या तान्ह्या मुलाची वाट पाहते, त्या दृष्टीमध्ये जो नाजूकपणा असतो.
नाना कमळदळें। डोलविजती ढाळें।
तो जेणें पाडें बुबुळें। वारा घेपे॥
अथवा वारा घेण्याकरिता कमळाचे फूल हळूहळू हलवले असता त्यापासून निघालेला वारा ज्याप्रमाणे डोळ्याच्या बुब्बुळास मोठा सुखकर वाटतो.
तैसेनि मार्दवें पाय। भूमीवरी न्यसीतु जाय।
लागती तेथ होय। जीवां सुख॥
तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवत तो जातो. ते पाय जेथे लागतील तेथे लोकांना सुख होते.