Saturday, February 8, 2025
HomeमानिनीReligiousSaint Dnyaneshwari : वाणी ज्ञानेश्वरांची

Saint Dnyaneshwari : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

सामरस्याची रससोय। अखंड अर्पितु जाय।
आपण भराडा होय। गुरु तो लिंग॥
गुरूला ऐक्यभावरूपी नैवेद्य नेहमी अर्पित राहतो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरूला शंकराची पिंडी करतो.
नातरी जीवाचिये सेजे। गुरु कांतु करूनि भुंजे।
ऐसीं प्रेमाचेनि भोजें। बुद्धी वाहे॥
अथवा जीवरूपी शय्येवर गुरूला पती करून भोगतो, अशी प्रेमाची आवड त्याची बुद्धी बाळगते.
कोणे एके अवसरीं। अनुरागु भरे अंतरीं।
कीं तया नाम करी। क्षीराब्धी॥
कोणा एका वेळी मनात गुरूविषयी प्रेम भरले की त्याला क्षीरसमुद्र असे नाव देतो.
तेथ ध्येयध्यान बहु सुख। तेंचि शेषतुका निर्दोख।
वरी जलशयन देख। भावी गुरु॥
त्या प्रेमरूपी क्षीरसागरात ध्येय जे गुरू, त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख, ते शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर जलशयन करणारे श्रीगुरू आहेत असे समजतो.
मग वोळगती पाय। ते लक्ष्मी आपण होय।
गरुड होऊनि उभा राहे। आपणचि॥
श्रीगुरुरूपी विष्णूच्या पायांची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो.
नाभीं आपणचि जन्मे। ऐसें गुरुमूर्तिप्रेमें।
अनुभवी मनोधर्में। ध्यानसुख॥
आपणाच श्रीगुरुरूपी विष्णूच्या नाभी कमळात जन्म घेतो म्हणजे ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने असे ध्यानसुख अनुभवतो.
एकाधिये वेळें। गुरु माय करी भावबळें।
मग स्तन्यसुखें लोळे। अंकावरी॥
आपल्या भावाच्या बळाने गुरूला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो.
नातरी गा किरीटी। चैतन्यतरुतळवटीं।
गुरु धेनु आपण पाठीं। वत्स होय॥
चैतन्यरूपी झाडाखाली गुरूला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो.
गुरुकृपास्नेहसलिलीं। आपण होय मासोळी।
कोणे एके वेळीं। हेंचि भावीं॥
गुरूच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी बनतो. कोणा एका वेळेला हीच कल्पना करतो.
गुरुकृपामृताचे वडप। आपण सेवावृत्तीचें होय रोप।
ऐसेसे संकल्प। विये मन॥
गुरुकृपेच्या ठिकाणी अमृताच्या वृष्टीची कल्पना करतो. आपल्या ठिकाणी सेवावृत्तीरूपी रोपाची कल्पना करतो.
चक्षुपक्षेवीण। पिलूं होय आपण।
कैसें पैं अपारपण। आवडीचें॥
डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे पक्ष्याचे पिल्लू आपणच होतो. त्याच्या प्रेमाचे अमर्यादपण कसे आहे.

Manini