कां सुकतया अंकुरा- । वरी पडलिया पीयूषधारा ।
नाना अल्पोदकींचा सागरा । आला मासा ॥
अथवा सुकणार्या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात, अथवा थोडा पाण्यातला मासा जसा समुद्रात यावा.
नातरी रंकें निधान देखिलें । कां आंधळिया डोळे उघडले ।
भणंगाचिया आंगा आलें । इंद्रपद ॥
अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टि यावी, अथवा भिकार्याला जसे इंद्रपद मिळावे.
तैसें गुरुकुळाचेनि नांवें । महासुखें अति थोरावे ।
जें कोडेंही पोटाळवें । आकाश कां ॥
त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतके वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू.
पैं गुरुकुळीं ऐसी । आवडी जया देखसी ।
जाण ज्ञान तयापासीं । पाइकी करी ॥
ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळासंबंधाने असे प्रेम तू पहाशील त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते असे समज.
आणि अभ्यंतरीलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे ।
श्रीगुरूंचें रूपडें । उपासी ध्यानीं ॥
आणि आतल्या बाजूकडे (अंत:करणात) प्रेमाच्या जोराने श्रीगुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो.
हृदयशुद्धीचिया आवारीं । आराध्यु तो निश्चल ध्रुव करी ।
मग सर्व भावेंसी परिवारीं । आपण होय ॥
अंत:करणाची शुद्धता हेच कोणी एक आवार, त्या आवारामधे आराधना करण्याला योग्य जो गुरु, त्याची प्राणप्रतिष्ठा करतो व मग काया, वाचा, मनाने श्रीगुरूचा लवाजमा आपण बनतो.
कां चैतन्यांचिये पोवळी । माजीं आनंदाचिया राउळीं ।
श्रिइगुरुलिंगा ढाळी । ध्यानामृत ॥
अथवा ज्ञानाच्या आवारात असणार्या आनंदाच्या देवळामधे गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो.
उदयिजतां बोधार्का । बुद्धीची डाळ सात्त्विका ।
भरोनियां त्र्यंबका । लाखोली वाहे ॥
बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विकभाव भरून तो त्यांची लाखोली श्रीगुरुरूपी शंकराला वहातो.
काळशुद्धी त्रिकाळीं । जीवदशा धूप जाळीं ।
न्यानदीपें वोंवाळी । निरंतर ॥
पवित्र काल ह्याच कोणी शिवपूजनाच्या तीन वेळा, त्यात जीवपणरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो.