Monday, March 17, 2025
HomeमानिनीReligiousDnyaneshwari : वाणी ज्ञानेश्वरांची

Dnyaneshwari : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हृदयवृत्ती पुढां। आंगचि घे दवडा।
काज करी होडा। मानसेंशीं॥
त्याच्या अंत:करणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते, त्याची प्रत्यक्ष कृती मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करते.
एकादियां वेळा। श्रीगुरुचिया खेळा।
लोण करी सकळा। जीविताचें॥
श्रीगुरूंच्या एखाद्या जराशा लीलेला आपल्या सर्व जीविताचे लोण करतो म्हणजे आपले सर्व जीवित त्यांच्या थोड्याशा खेळावरून ओवाळून टाकतो.
जो गुरुदास्यें कृशु। जो गुरुप्रेमें सपोषु।
गुरुआज्ञे निवासु। आपणचि जो॥
जो गुरुसेवेच्या योगाने रोडका झालेला असतो, जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व जो आपण स्वत: श्रीगुरूच्या आज्ञेचे स्वत:च्या राहण्याचे ठिकाण असतो.
जो गुरु कुळें सुकुलीनु। जो गुरुबंधुसौजन्यें सुजनु।
जो गुरुसेवाव्यसनें सव्यसनु। निरंतर॥
जो श्रीगुरूच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो, जो आपल्या गुरुबंधुवरील स्नेहाचे योगाने भला मनुष्य ठरलेला असतो व जो नेहमी गुरुसेवेच्या छंदामुळे व्यसनी असतो.
गुरुसंप्रदायधर्म। तेचि जयाचे वर्णाश्रम।
गुरुपरिचर्या नित्यकर्म। जयाचें गा॥
गुरुसंप्रदायाचे जे आचार असतात, ते ज्याचे वर्णाश्रम विहितकर्मे असतात, अरे गुरुसेवा हे ज्याचे नित्यकर्म असते.
गुरु क्षेत्र गुरु देवता। गुरु माय गुरु पिता।
जो गुरुसेवेपरौता। मार्ग नेणें॥
गुरु हेच क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरुच माता, गुरुच पिता, तो गुरुपूजेपलीकडील दुसरा मार्ग जाणत नाही.
श्रीगुरुचे द्वार। तें जयाचें सर्वस्व सार।
गुरुसेवकां सहोदर। प्रेमें भजे॥
श्रीगुरुचे द्वार हेच ज्याचे सर्वस्व सार आहे व गुरुसेवकांना तो सख्ख्या भावाच्या प्रेमाने भजतो.
जयाचें वक्त। वाहे गुरुनामाचे मंत्र।
गुरुवाक्यावांचूनि शास्त्र। हातीं न शिवे॥
ज्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते व गुरुवाक्यावाचून दुसर्‍या शास्त्राला हात लावत नाही.
शिवतलें गुरुचरणीं। भलतैसें हो पाणी।
तया सकळ तीर्थें आणी। त्रैलोक्यींचीं॥
ज्या कोणत्याही पाण्याला श्रीगुरुचरणांचा स्पर्श झाला आहे, त्या पाण्याला तीर्थे समजून त्या तीर्थाच्या यात्रेला त्रैलोक्यातील तीर्थे आणतो, म्हणजे त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे समजतो.
श्रीगुरुचें उशिटें। लाहे जैं अवचटें।
तैं तेणें लाभें विटे। समाधीसी॥
त्याला जेव्हा श्रीगुरुचे उच्छिष्ट अकस्मात प्राप्त होते, तेव्हा त्या लाभाने तो समाधीस विटतो.

Manini