Saturday, February 8, 2025
HomeमानिनीReligiousSaint Dnyaneshwari Adyay 13 : वाणी ज्ञानेश्वरांची

Saint Dnyaneshwari Adyay 13 : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

चोखाळपण रत्नाचें। रत्नावरी किरणाचें।
तैसें पुढां मन जयाचें। करणें पाठीं॥
रत्नाचा निर्मळपणा असतो, पण त्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा अधिक असतो. त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते.
आलोचूं जो नेणे। अनुभवचि जोगावणें।
धरी मोकळी अंतःकरणें। नव्हेचि जया॥
जो कोणत्याही बाबतीत आगाऊ विचार करण्याचे जाणतच नाही व जो आत्मानुभावात तृप्त असतो, जो आपल्या मनाने कशाशी चिकटतही नाही व कशाचा मुद्दाम त्यागही करीत नाही.
दिठी नोहे मिणधी। बोलणें नाहीं संदिग्धी।
कवणेंसीं हीनबुद्धी। राहाटीजे ना॥
ज्याची दृष्टी कपटी नसते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि कोणाशीही हलकट बुद्धीने वागत नाही.
दाही इंद्रियें प्रांजळें। निष्प्रपंचें निर्मळें।
पांचही पालव मोकळे। आठही पाहर॥
ज्याची दहाही इंद्रिये सरळ, निष्कपट आणि शुद्ध असतात.
अमृताची धार। तैसें उजूं अंतर।
किंबहुना जो माहेर। या चिन्हांचें॥
अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंत:करण सरळ असते. फार काय सांगावे? जो या चिन्हाचे माहेर असतो.
तो पुरुष सुभटा। आर्जवाचा आंगवटा।
जाण तेथेंचि घरटा। ज्ञानें केला॥
अर्जुना, तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले राहावयाचे ठिकाण केले आहे असे समज.
आतां ययावरी। गुरुभक्तीची परी।
सांगों गा अवधारीं। चतुरनाथा॥
आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू. हे चतुरांच्या राजा तो तू ऐक.
आघवियाचि दैवां। जन्मभूमि हे सेवा।
जे ब्रह्म करी जीवा। शोच्यातेंहि॥
ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते.
हें आचार्योपास्ती। प्रकटिजैल तुजप्रती।
बैसों दे एकपांती। अवधानाची॥
ती गुरुभक्ती आता तुला स्पष्ट सांगितली जाईल, मात्र तू तिकडे एकसारखे लक्ष दे.
तरी सकळ जळसमृद्धी। घेऊनि गंगा निघाली उदधी।
कीं श्रुति हे महापदीं। पैठी जाहाली॥
तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा जशी समुद्रात प्रवेश करते अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात.
नाना वेंटाळूनि जीवितें। गुणागुण उखितें।
प्राणनाथा उचितें। दिधलें प्रिया॥
आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणावगुणांसह सरसकट आपल्या स्वत:ला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले.

Manini