संत तुकाराम महाराजांच्या पालखीला प्रारंभ, टाळ-मृदूगांच्या तालावर वैष्णवांचा भक्तीमहासागर

श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. दरम्यान या पालखी सोहळ्यातील पहिला मुक्काम इनामदार वाड्यात आहे.

tukaram maharaj palakhi

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३३७ व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दुपारी तीनच्या सुमारास या पालखीने आज प्रस्थान केले. टाळ, मृदूगांच्या गजरात वैष्णवांचा भक्तीमहासागर पंढरपूरकडे रवाना झाला आहे. यावेळी, खासदार श्रीरंग बारणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार सुनिल शेळके, त्यांच्या पत्नी सारीका शेळके, माजी मंत्री संजय भेगडे, भाग्यवान वारकरी नांदेडच्या आजामेळा दिंडीचे वीणेकरी गोविंद गवलवार यांच्या हस्ते महापूजा झाली. यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. दरम्यान या पालखी सोहळ्यातील पहिला मुक्काम इनामदार वाड्यात आहे. (Sant Tukaram Maharaj palkhi started from dehu pune)

हेही वाचा – यंदा आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी!

पावसाळा सुरु झाला की वारकऱ्यांचं लक्ष आषाढी वारीकडे लागतं. भागवत धर्माची पताका फडकवत वारकरी ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. प्रथेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व शीळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे व अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. साडे सहा वाजता तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधिची व सात वाजता वैंकुठगमण मंदिरात महापूजा संस्थानचे विश्वस्थांच्या हस्ते करण्यात आली.