लीलाकमळें खेळणें। कांपुष्पमाळा झेलणें।
न करी म्हणे गोफणें। ऐसें होईल॥
सहज मजेने कमळाने खेळावयाचे अथवा फुलांच्या माळा झेलावयाच्या हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना गोफणीप्रमाणे होईल असे म्हणून जो वरील गोष्टी करीत नाहीत.
हालवतील रोमावळी। यालागीं आंग न कुरवाळी।
नखांची गुंडाळी। बोटांवरी॥
अंगावर केसांच्या रांगा हलतील व त्या योगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल. याकरिता जो अंग कुरवाळत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटांवर वाढतात.
तंव करणेयाचाचि अभावो। परी ऐसाही पडे प्रस्तावो।
तरी हातां हाचि सरावो। जे जोडिजती॥
आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते, परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत.
कां नाभिकारा उचलिजे। हातु पडिलियां देइजे।
नातरी आर्तातें स्पर्शिजे। अळुमाळु॥
अथवा ‘भिऊ नकोस’ असे सांगण्यास हात उचलावेत अथवा कोणी पडलेल्यास वर काढण्यास हात द्यावेत किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरिता हाताने थोडासा स्पर्श करावा.
हेंही उपरोधें करणें। तरी आर्तभय हरणें।
नेणती चंद्रकिरणें। जिव्हाळा तो॥
तरी दु:खाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे हेदेखील तो मोठ्या जुलूमाने करतो, पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा
चंद्रकिरणांनासुद्धा माहीत नसतो.
पावोनि तो स्पर्शु। मलयानिळु खरपुसु।
तेणें मानें पशु। कुरवाळणें॥
त्याच्या हस्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणार्या वार्याचा स्पर्श कडक भासेल. इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदु व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवाळणे असते.
जे सदा रिते मोकळे। जैशी चंदनांगें निसळें।
न फळतांही निर्फळें। होतीचिना॥
जे हात नेहमी रिकामे व मोकळे असतात. ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत असे म्हणता येणार नाही.
आतां असो हें वाग्जाळ। जाणें तें करतळ।
सज्जनांचे शीळ। स्वभाव जैसे॥
आता हे भाराभर बोलणे राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ज्याप्रमाणे असतो, त्याप्रमाणे त्याचे ते करतल असतात असे समज.