अर्जुना गा तो भक्तु। तोचि योगी तोचि मुक्तु।
तो वल्लभा मी कांतु। ऐसा पढिये॥
अर्जुना तो भक्त. तोच योगी व तोच मुक्त. तो जशी काही माझी बायको व मी तिचा नवरा असा तो मला आवडतो.
हें ना तो आवडे। मज जीवाचेनि पाडें।
हेंही एथ थोकडें। रूप करणें॥
इतकेच नाही तर तो मला जिवाइतका प्यारा आहे, पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे, त्याला हीदेखील उपमा अपुरी आहे.
तरी पढियंतयाची काहाणी। हे भुलीची भारणी।
इयें तंव न बोलणीं। परी बोलवी श्रद्धा॥
परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत, पण अर्जुना तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलावयाची गोष्ट बोलावयास लावते.
म्हणोनि गा आम्हां। वेगां आली उपमा।
एर्हवीं काय प्रेमा। अनुवादु असे?॥
म्हणून आम्ही झटकन उपमा देऊ शकलो, नाहीतर या प्रेमाला बोलून दाखवता येईल काय?
आतां असो हें किरीटी। पैं प्रियाचिया गोष्टी।
दुणा थांव उठी। आवडी गा॥
आता अर्जुना हे असू दे, पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते.
तयाही वरी विपायें। प्रेमळु संवादिया होये।
तिये गोडीसी आहे। कांटाळें मग?॥
त्यात आणखी चर्चा करणारा प्रेमळा भक्त मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा काय आहे?
म्हणोनि गा पंडुसुता। तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता।
वरी प्रियाची वार्ता। प्रसंगें आली॥
म्हणून अर्जुना, तूच प्रेमळ भक्त व प्रेमळ श्रोता आहेस. शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाचीच गोष्ट बोलण्याची वेळ आली आहे.
तरी आतां बोलों । भलें या सुखा मीनलों।
ऐसें म्हणतखेंवीं डोलों। लागला देवो॥
तर आता मी बोलतोच. या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे, असे म्हणताक्षणीच देव लगेच डोलायला लागले.