श्रावण महिन्यात महादेवांच्या पूजनाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र, श्रावणातील सोमवारचं नाही तर प्रत्येक दिवस आध्यात्मिक दृष्टिकोणातून महत्वाचे मानला जातो. श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा-आराधना केली जाते त्याच प्रमाणे श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते. तर श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. अशातच, नुकताच श्रावण महिना सुरु झाला असून उद्या 18 ऑगस्ट रोजी श्रावणातला पहिला शुक्रवार असणार आहे.
श्रावणातील शुक्रवारी करा जिवतीची पूजा
श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. जिवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस लावले जाते आणि वाराप्रमाणे त्याची पूजा केली जाते.
जिवतीची कथा
पौराणिक कथेनुसार, जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात राहत होती. मगधचा राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन वेगवेगळे भाग असलेल्या मुलाला एकत्र जुळवले आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. तेव्हापासून जिवतीची पूजा केली जाऊ लागली.
अशी करा जिवतीची पूजा
- श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा करताना “जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।।” हा श्लोक म्हटला जातो.
- या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. या तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी.
- यासह 21 मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता वाहाव्यात.
- धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी.
- जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरावी.
हेही वाचा :