बुद्धीचिये पाठीं पोटीं। कर्माआदि कां शेवटीं।
मातें बांधणें किरीटी। दुवाड जरी॥
बुद्धीच्या मागे व पुढे आणि कर्माच्या आरंभी व शेवटी हे अर्जुना मला बांधणे तुला कठीण वाटत असेल.
तरी हेंही असो। सांडीं माझा अतिसो।
परि संयतिसीं वसो। बुद्धि तुझी॥
तर हेदेखील राहू दे. माझ्याकरिता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला, त्याविषयीचा आग्रहही एकीकडे राहू दे, परंतु तुझी बुद्धी निग्रहयुक्त असू दे.
आणि जेणें जेणें वेळें। घडती कर्में सकळें।
तयांचीं तियें फळें। त्यजितु जाय॥
आणि ज्या ज्या वेळी कर्मे घडतील त्या त्या वेळी त्यांची ती सर्व फळे तू टाकीत जा.
वृक्ष कां वेली। लोटती फळें आलीं।
तैसीं सांडीं निपजलीं। कर्में सिद्धें॥
झाडास अथवा वेलीस आलेली फळे जशी ती झाडे व वेली टाकून देतात, त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे तू टाकून दे.
परि मातें मनीं धरावें। कां मज उद्देशें करावें।
हें कांहीं नको आघवें। जाऊं दे शून्यीं॥
परंतु मनात माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे काही नको, तर ते शून्यात जाऊ दे.
खडकीं जैसें वर्षलें। कां आगीमाजीं पेरिलें।
कर्म मानी देखिलें। स्वप्न जैसें॥
खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले बी अथवा पाहिलेले स्वप्न हे जसे व्यर्थ असते, त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थ मान.
अगा आत्मजेच्या विषीं। जीवु जैसा निरभिलाषी।
तैसा कर्मीं अशेषीं। निष्कामु होईं॥
अरे अर्जुना, आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव निष्काम असतो त्याप्रमाणे सर्व कर्मांच्या फलांविषयी तू निष्काम हो.
वन्हीची ज्वाळा जैसी। वायां जाय आकाशीं।
क्रिया जिरों दे तैसी। शून्यामाजी॥
अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते, म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्यामध्ये जिरू देत.