अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु ।
परी योगामाजीं योगु । धुरेचा हा ॥
अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो खरा, पण सर्व योगांमधे हा योग श्रेष्ठ आहे.
येणें फलत्यागें सांडे । तें तें कर्म न विरूढे ।
एकचि वेळे वेळुझाडें । वांझें जैसीं ॥
जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, त्याप्रमाणे त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही. (ते कर्म सुखदु:खाचा भोग देण्यास पुढे जन्माला कारणीभूत होत नाही.)
तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे ।
किंबहुना येरझारे । चिरा पडे ॥
त्याप्रमाणे याच शरीराने शरीराला येणे (जन्माला येणे) संपते. फार काय सांगावे ? जन्ममरणाच्या खेपांवर दगड पडतो. (जन्ममरणाच्या खेपा बंद पडतात).
पैं अभ्यासाचिया पाउटीं । ठाकिजे ज्ञान किरीटी ।
ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाचिये ॥
मग अर्जुना, अभ्यासाच्या (वरील ९ व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे) पायरीने ज्ञान (परमेश्वराचे परोक्षज्ञान) प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस यावे. (त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचे ध्यान करावे).
मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव ।
तेव्हां कर्मजात सर्व । दूरी ठाके ॥
मग सर्व भाव (कायिक, वाचिक, मानसिक भाव) ध्यानाला आलिंगन देतात म्हणजे ध्यानात गढून जातात. त्यावेळेला कर्म मात्र जेवढे आहे ते दूर रहाते. (म्हणजे होत नाही. कारण कर्म करण्याची साधने किंवा द्वारे जी काया, वाचा व मन ती सर्व ध्यानात गढून गेल्यामुळे कर्म करण्यास कोणी जागेवर नसतात, म्हणून कर्मे होत नाहीत).
कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे ।
त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ॥
फलाला उत्पन्न करणारे जे कर्म ते जेव्हा नाहीसे होते तेव्हा फालत्याग संभवतो आणि अशा त्या त्यागामुळे पूर्ण शांती (पूर्णब्रह्मस्थिति) हस्तगत होते.