तया संगाचेनि सुरवाडें । मज विदेहा देह धरणें घडे ।
किंबहुना आवडे । निरुपमु ॥
त्याच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देहरहित त्या मला देह धारण करावा लागतो. फार काय सांगावे ? तो मला किती आवडतो याला उपमाच नाही.
तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र? ।
परी तयाचें चरित्र । ऐकती जे ॥
त्याच्याशी आमची मैत्री असते. यात काय आश्चर्य आहे? परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात.
तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।
जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ॥
जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात, ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात हे खरे आहे.
जो हा अर्जुना साद्यंत । सांगितला प्रस्तुत ।
भक्तियोगु समस्त- । योगरूप ॥
अर्जुना जे हे समस्त योगरूप आम्ही तुला सांगितले ते म्हणजे आम्ही तुला आता आदिअंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितला.
तया मी प्रीति करी । कां मनीं शिरसा धरीं ।
येवढी थोरी । जया स्थितीये ॥
ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वत: प्रीती करतो, मी त्याचे ध्यान करतो, अथवा त्याला मस्तकावर धारण करतो.
ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य ।
करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥
ती गोष्ट (वर सांगितलेले भक्तियोगाचे वर्णन) जी चित्ताला रंजवणारी, अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी आहे, ती ऐकून जे पुरुष तिला (त्या गोष्टीला) स्वानुभवाने जाणतात.
तैसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचे ठायीं विस्तरे ।
जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती ॥
त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो, एवढेच नाही तर ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्याचे अनुष्ठान करतात.