लोकपाळ नित्य नवे। दिग्गजांचे मेळावे।
स्वर्गींचिये आडवे। रिगोनि मोडी॥
हा काळरूपी सिंह स्वर्गरूपी अरण्यात शिरून रोज नवनवे लोकपाल व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो.
येर ययाचेनि अंगवातें। जन्ममृत्यूचिये गर्तें।
निर्जिवें होऊनि भ्रमतें। जीवमृगें॥
या काळरूपी सिंहाच्या अंगाच्या वार्याने इतर जीवरूप पशू निर्जीव होऊन जन्ममृत्यूच्या खळग्यात भ्रमत राहतात.
न्याहाळीं पां केव्हडा। पसरलासे चवडा।
जो करूनियां माजिवडा। आकारगजु॥
सर्व आकारमात्र पदार्थ हाच कोणी हत्ती, तो ज्या चवड्यामध्ये धरला गेला आहे, तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरला आहे?
म्हणौनि काळाची सत्ता। हाचि बोलु निरुता।
ऐसे वाद पंडुसुता। क्षेत्रालागीं॥
म्हणून काळाची सत्ता आहे हे बोलणे खरे आहे. अर्जुना असे हे क्षेत्राविषयीचे वाद आहेत.
हे बहु उखिविखी। ऋषीं केली नैमिषीं।
पुराणें इयेविषीं। मतपत्रिका॥
नैमिषारण्यात ऋषींनी या क्षेत्रसंबंधाने पुष्कळ वादविवाद केला आहे. याविषयी पुराणेही साक्षीभूत आधार आहेत.
अनुष्टुभादि छंदें। प्रबंधीं जें विविधें।
ते पत्रावलंबन मदें। करिती अझुनी॥
अनुष्टुप् छंदादि जी निरनिराळ्या प्रकारची काव्यरचना आहे, ती ज्या ग्रंथात आहे, त्या ग्रंथाचा अद्यापपर्यंत लोक गर्वाने आश्रय करतात.
वेदींचें बृहत्सामसूत्र। जें देखणेपणें पवित्र।
परी तयाही हें क्षेत्र। नेणवेचि॥
ऋग्वेदातील जे बृहत्सामसूक्त आहे ते ज्ञानदृष्टीने पवित्र आहे, तथापि या सूत्रासही हे क्षेत्र समजले नाही.
आणीक आणीकींही बहुतीं। महाकवीं हेतुमंतीं।
ययालागीं मती। वेंचिलिया॥
आणखी पुष्कळ युक्तियुक्त अशा महाकवींनी या क्षेत्रनिर्णयाकरिता आपली बुद्धी खर्च केली.
परी ऐसें हें एवढें। कीं अमुकेयाचेंचि फुडें।
हें कोणाही वरपडें। होयचिना॥
परंतु हे क्षेत्र असे आहे अथवा एवढे आहे अथवा हे अमक्याच्या मालकीचे नक्की आहे असे अजूनपर्यंत कोणासही कळलेले नाही.
आतां यावरी जैसें। क्षेत्र हें असे।
तुज सांगों तैसें। साद्यंतु गा॥
आता अर्जुना यानंतर हे क्षेत्र जसे आहे तसे आरंभापासून शेवटपर्यंत तुला सांगतो.