महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥
पाच महाभूते, अहंकार, बुद्धि, अव्यक्त (मूलप्रकृति) दहा इंद्रिये व अकरावे मन आणि इंद्रियांना गोचर असे शब्दादि दहा विषय.
इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः ।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥
इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकारांसह क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे.
तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु ।
बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा ॥
तर पाचमहाभूतांचा समुदाय आणि एक अहंकार, बुद्धि, अव्यक्त, दहा इंद्रियांचा समुदाय.
मन आणीकही एकु । विषयांचा दशकु ।
सुख दुःख द्वेषु । संघात इच्छा ॥
आणखी एक मन, दहा विषयांचा समुदाय, सुख, दु:ख, द्वेष, संघात, इच्छा.
आणि चेतना धृती । एवं क्षेत्रव्यक्ती ।
सांगितली तुजप्रती । आघवीची ॥
याप्रमाणे तुला सर्व क्षेत्र स्पष्ट सांगितले.
आतां महाभूतें कवणें । कवण विषयो कैसीं करणे ।
हें वेगळालेपणें । एकैक सांगों ॥
आता महाभूते कोणती व विषय कोणते ते एकेक निरनिराळे सांगतो.
तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इयें तुज ।
सांगितलीं बुझ । महाभूतें पांचें ॥
तर पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, ही तुला सांगितली ती पंचमहाभूते समज.
आणि जागतिये दशे । स्वप्न लपालें असे ।
नातरी अंवसे । चंद्र गूढु ॥
आणि जागृतावस्थेत स्वप्न जसे लीन असते अथवा अमावास्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो.
नाना अप्रौढबाळकीं । तारुण्य राहे थोकीं ।
कां न फुलतां कळिकीं । आमोदु जैसा ॥
अथवा लहान बालकांमधे तारुण्य जसे गुप्त असते, अथवा न उमललेल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो.
किंबहुना काष्ठीं । वन्हि जेवीं किरीटी ।
तेवीं प्रकृतिचिया पोटीं । गोप्यु जो असे ॥
फार काय सांगावे? अर्जुना, लाकडामधे अग्नी जसा गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो अहंकार गुप्त असतो.