तरी स्पर्शु आणि शब्दु। रूप रसु गंधु।
हा विषयो पंचविधु। ज्ञानेंद्रियांचा॥
तर शब्द आणि स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे पाच प्रकारचे विषय आहेत.
इहीं पांचैं द्वारीं। ज्ञानासि धांव बाहेरी।
जैसा कां हिरवे चारीं। भांबावे पशु॥
या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते, ते कसे? तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणात जनावरे भांबावतात.
मग स्वर वर्ण विसर्गु। अथवा स्वीकार त्यागु।
संक्रमण उत्सर्गु। विण्मूत्राचा॥
मग तोंडाने स्वर, अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे, पायाने चालणे, उपस्थाने मूत्राचा त्याग करणे व गुदाने मलाचा त्याग करणे.
हे कर्मेंद्रियांचे पांच। विषय गा साच।
जे बांधोनियां माच। क्रिया धांवे॥
हे कर्मेंद्रियांचे पाच प्रकारचे विषय खरे आहेत व यांचा पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालतो.
ऐसे हे दाही। विषय गा इये देहीं।
आतां इच्छा तेही। सांगिजैल॥
याप्रमाणे हे दहा विषय या देहामध्ये आहेत व आता इच्छा काय तेही सांगण्यात येईल.
तरि भूतलें आठवे। कां बोलें कान झांकवे।
ऐसियावरि चेतवे। जे गा वृत्ती॥
मागील भोगलेल्या गोष्टीच्या आठवणीने अथवा दुसर्याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात.
इंद्रियाविषयांचिये भेटी। सरसीच जे गा उठी।
कामाची बाहुटी। धरूनियां॥
इंद्रिये व विषय यांची भेट होताक्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते.
जियेचेनि उठिलेपणें। मना सैंघ धावणें।
न रिगावें तेथ करणें। तोंडें सुती॥
जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावावयास लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खुपसतात.
जिये वृत्तीचिया आवडी। बुद्धी होय वेडी।
विषयां जिया गोडी। ते गा इच्छा॥
ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते. अरे अर्जुना, ती इच्छा असे तू समज.