जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरीं ।
जे तिहीं अवस्थांतरी । पालटेना ॥
जी पायांच्या नखापासून तो मस्तकाच्या केसापर्यंत नेहेमी खडखडीत जागी असते आणि जी तिन्ही अवस्थांमधे बदलत नाही.
मनबुद्ध्यादि आघवीं । जियेचेनि टवटवीं ।
प्रकृतिवनमाधवीं । सदांचि जे ॥
मन व बुद्धि जिच्या योगाने प्रसन्न असतात. व जी नेहेमी प्रकृति – (शरीर) रूपी वनाचा वसंतऋतु आहे.
जडाजडीं अंशीं । राहाटे जे सरिसी ।
ते चेतना गा तुजसी । लटिकें नाहीं ॥
जी जड व चेतन पदार्थात सारखी वागते, ती अर्जुना चेतना होय, हे मी तुला खोटे सांगत नाही.
पैं रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे ।
कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती ॥
आपला लवाजमा वगैरे किती आहे जे राजास ठाऊक नसताही त्याची आज्ञाच जशी परचक्राचे निवारण कराते, अथवा पूर्ण चंद्राच्या योगाने समुद्रास जशी भरती येते (पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहीत नसते).
नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन ।
कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥
अथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडास सचेतन करते (हालचाल करावयास लावते) अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करायला लावते.
अगा मुख मेळेंविइण । पिलियाचें पोषण ।
करी निरीक्षण । कूर्मी जेवीं ॥
अरे अर्जुना, कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पहाण्याने करते.
पार्था तियापरी । आत्मसंगती इये शरीरीं ।
सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ॥
अर्जुना, त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगति ही जडाला सजीवत्वाचा उपयोग करते, (म्हणजे जडाला चेतनदशेला आणते).
मग तियेतें चेतना । म्हणिपे पैं अर्जुना ।
आतां धृतिविवंचना । भेदु आइक ॥
याप्रमाणे अर्जुना, जडाला चेतनदशेला आणल्याकारणाने त्या आत्मसत्तेला ‘चेतना’ असे म्हटले जाते. आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक.