तरी भूतां परस्परें। उघड जाति स्वभाववैरें।
नव्हे पृथ्वीतें नीरें। न नाशिजे?॥
तर पंचमहाभूतांमध्ये एकमेकांशी जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करीत नाही काय?
नीरातें आटी तेज। तेजा वायूसि झुंज।
आणि गगन तंव सहज। वायू भक्षी॥
पाण्याला तेज आटवते, तेजाचे व वायूचे वैर आहे आणि आकाश तर सहज वायूला नाहीसा करते.
तेवींचि कोणेही वेळे। आपण कायिसयाही न मिळे।
आंतु रिगोनि वेगळें। आकाश हें॥
कोणत्याही वेळी कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमध्ये शिरून पुन्हा सर्वांहून स्वरूपत: अलग असते ते हे आकाश होय.
ऐसीं पांचही भूतें। न साहती एकमेकांतें।
कीं तियेंही ऐक्यातें। देहासी येती॥
अशी पाचही महाभूते एकमेकाला सहन करीत नाहीत असे वैर असूनही ती पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रगटतात.
द्वंद्वाची उखिविखी। सोडूनि वसती एकीं।
एकेकातें पोखी। निजगुणें गा॥
म्हणजे द्वंद्वाची उखीविखी सोडून एकोप्याने राहतात. इतकेच नाही तर अर्जुना, आपल्या गुणाने एक दुसर्याला पोषित असतो.
ऐसें न मिळे तयां साजणें। चळे धैर्यें जेणें।
तयां नांव म्हणें। धृती मी गा॥
याप्रमाणे ज्यांचे स्वभावत: एकमेकांशी पटत नाही, त्यांची मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते त्याचे नाव धृती असे मी म्हणतो.
आणि जीवेंसी पांडवा। या छत्तिसांचा मेळावा।
तो हा एथ जाणावा। संघातु पैं गा॥
अर्जुना, वर सांगितलेल्या तत्त्वांचा जीवभावाने असणारा समुदाय येथे छत्तिसावे संघात नावाचे तत्त्व जाणावे.
एवं छत्तीसही भेद। सांगितले तुज विशद।
यया येतुलियातें प्रसिद्ध। क्षेत्र म्हणिजे॥
याप्रमाणे छत्तीसही प्रकार स्पष्ट सांगितले. एवढ्यांना क्षेत्र म्हणतात हे प्रसिद्ध आहे.
रथांगांचा मेळावा। जेवीं रथु म्हणिजे पांडवा।
कां अधोर्ध्व अवेवां। नांव देहो॥
चाक, जूं वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास रथ म्हणावे किंवा वरच्या व खालच्या अवयवांना मिळून जसे देह नाव येते.