Wednesday, January 1, 2025
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे ।
कां वाक्यें म्हणिपती पुंजे । अक्षरांचे ॥
हत्ती, घोडे वगैरेंच्या समुदायास जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्ये म्हणतात.
कां जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा ।
नाना लोकां सकळां । नाम जग ॥
अथवा ढगांचा समुदाय, आभाळ या नावाने बोलला जातो अथवा सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते.
कां स्नेहसूत्रवन्ही । मेळु एकिचि स्थानीं ।
धरिजे तो जनीं । दीपु होय ॥
अथवा तेल, वात व अग्नि यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे, तोच लोकात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो.
तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें ।
तेणें समूह परत्वें । क्षेत्र म्हणिपे ॥
त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदायपरत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते.
आणि वाहतेनि भौतिकें । पाप पुण्य येथें पिके ।
म्हणौनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों ॥
लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे (शरीररूप शेतात) पाप-पुण्यरूप पीक पिकते, म्हणून आम्ही कौतुकाने ह्या देहाला क्षेत्र असे म्हणतो.
आणि एकाचेनि मतें । देह म्हणती ययातें ।
परी असो हें अनंतें । नामें यया ॥
कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात. पण आता हे राहू दे. या क्षेत्राला अनंत नावे आहेत.
पैं परतत्त्वाआरौतें । स्थावराआंतौतें ।
जें कांहीं होतें जातें । क्षेत्रचि हें ॥
परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरापर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते, ते सर्व क्षेत्रच होय.
परि सुर नर उरगीं । घडत आहे योनिविभागीं ।
तें गुणकर्मसंगीं । पडिलें सातें ॥
परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव, मनुष्य, सर्प वगैरे जातींच्या वेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते.

- Advertisment -

Manini