हेचि गुणविवंचना। पुढां म्हणिपैल अर्जुना।
प्रस्तुत आतां तुज ज्ञाना। रूप दावूं॥
अर्जुना, हाच गुणांचा विचार तुला पुढे सांगण्यात येईल. सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो.
क्षेत्र तंव सविस्तर। सांगितलें सविकार।
म्हणौनि आतां उदार। ज्ञान आइकें॥
क्षेत्र तर आम्ही तुला विकारांसह विस्तारपूर्वक सांगितले. म्हणून आता उदार ज्ञान ऐक.
जया ज्ञानालागीं। गगन गिळिताती योगी।
स्वर्गाची आडवंगी। उमरडोनि॥
ज्या ज्ञानाकरिता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिळतात.
न करिती सिद्धीची चाड। न धरिती ऋद्धीची भीड।
योगाऐसें दुवाड। हेळसिती॥
ज्या ज्ञानाकरिता योगी सिद्धीची इच्छा करीत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात.
तपोदुर्गें वोलांडित। क्रतुकोटि वोवांडित।
उलथूनि सांडित। कर्मवल्ली॥
ज्या ज्ञानाकरिता कित्येक लोक तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यवधी यज्ञ आचरून त्या अनुष्ठानांतून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाची उलथापालथ करून त्याचा त्याग करतात.
नाना भजनमार्गी। धांवत उघडिया आंगीं।
एक रिगताति सुरंगीं। सुषुम्नेचिये॥
अथवा कित्येक उघड्या अंगांनी भजन मार्गाने धावतात व कित्येक सुषुम्नेच्या भुयारात शिरतात.
ऐसी जिये ज्ञानीं। मुनीश्वरांची उतान्ही।
वेदतरूच्या पानोवानीं। हिंडताती॥
मुनीश्वरांस ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरिता वेदरूपी झाडाचे पान आणि पान हिंडतात.
देईल गुरुसेवा। इया बुद्धि पांडवा।
जन्मशतांचा सांडोवा। टाकित जे॥
अर्जुना, गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून जन्म ओवाळून टाकतात.
जया ज्ञानाची रिगवणी। अविद्ये उणें आणी।
जीवा आत्मया बुझावणी। मांडूनि दे॥
या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसे करतो. जीव व ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो.
जें इंद्रियांचीं द्वारें आडी। प्रवृत्तीचे पाय मोडी।
जें दैन्यचि फेडी। मानसाचें॥
जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्य्र नाहीसे करते.
द्वैताचा दुकाळु पाहे। साम्याचें सुयाणें होये।
जया ज्ञानाची सोये। ऐसें करी॥
द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो व सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात, ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते.
मदाचा ठावोचि पुसी। जें महामोहातें ग्रासी।
नेदी आपपरु ऐसी। भाष उरों॥
जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठावठिकाणा नाहीसा करते व जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते. आपले आणि दुसर्याचे ही गोष्टच शिल्लक राहत नाही.