मदाचा ठावोचि पुसी। जें महामोहातें ग्रासी।
नेदी आपपरु ऐसी। भाष उरों॥
जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठावठिकाणा नाहीसा करते व जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते व (जे) आपले आणि दुसर्याचे ही गोष्टच शिल्लक राहू देत नाही.
जें संसारातें उन्मूळी। संकल्पपंकु पाखाळी।
अनावरातें वेंटाळी। ज्ञेयातें जें॥
अर्जुना जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकते. आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टाकते.
जयाचेनि जालेपणें। पांगुळा होईजे प्राणें।
जयाचेनि विंदाणें। जग हें चेष्टें॥
जे प्राप्त झाले असतां प्राण पांगुळा होतो (इंद्रियांकडून विषयभोग मिळवण्याची त्याची हाव बंद होते) व ज्याच्या सत्तेने सर्व जगातील व्यापार चालतात.
जयाचेनि उजाळें। उघडती बुद्धीचे डोळे।
जीवु दोंदावरी लोळे। आनंदाचिया॥
ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो.
ऐसें जें ज्ञान। पवित्रैकनिधान।
जेथ विटाळलें मन। चोख कीजे॥
असे जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे व जेथे (जे प्राप्त झाले असता) विषयाने विटाळलेले मन शुद्ध करता येते.
आत्मया जीवबुद्धी। जे लागली होती क्षयव्याधी।
ते जयाचिये सन्निधी। निरुजा कीजे॥
देह बुद्ध्यादि अनात्म पदार्थ मी आहे असा भ्रमाचा क्षयरोग आत्म्याला जो झाला होता, तो रोग ज्याचा सहवास बरा करतो.
तें अनिरूप्य कीं निरूपिजे। ऐकतां बुद्धी आणिजे।
वांचूनि डोळां देखिजे। ऐसें नाहीं॥
ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही, तथापि त्याचे निरूपण केले जाईल आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर ज्ञान बुद्धीला जाणता येईल. त्याशिवाय डोळ्यांनी पाहता येईल असे ते ज्ञान नाही.
मग तेचि इये शरीरीं। जैं आपुला प्रभावो करी।
तैं इंद्रियांचिया व्यापारीं। डोळांहि दिसे॥
मग तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रगट करते, तेव्हा ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते.
पैं वसंताचें रिगवणें। झाडांचेनि साजेपणें।
जाणिजे तेवीं करणें। सांगती ज्ञान॥
वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो, त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात.