Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पूज्यता डोळां न देखावी। स्वकीर्ती कानीं नायकावी।
हा अमुका ऐसी नोहावी। सेचि लोकां॥
आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये, हा एक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये.
तेथ सत्काराची कें गोठी। कें आदरा देईल भेटी।
मरणेंसीं साटी। नमस्कारितां॥
असे ज्याला वाटते अशा पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कोठे आहे? असा मनुष्य आदराला भेट कशी देईल? म्हणजे आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा करेल? त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते.
वाचस्पतीचेनि पाडें। सर्वज्ञता तरी जोडे।
परी वेडिवेमाजीं दडे। महमेभेणें॥
बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते, परंतु महत्त्वाच्या भीतीने तो वेडात लपतो.
चातुर्य लपवी। महत्त्व हारवी।
पिसेपण मिरवी। आवडोनि॥
आपले ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो, आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो व मोठ्या आवडीने वेडेपण लोकात दाखवतो.
लौकिकाचा उद्वेगु। शास्त्रांवरी उबगु।
उगेपणीं चांगु। आथी भरु॥
लोकात होणार्‍या प्रसिद्धीची ज्यास शिसारी असते व शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, काही न करता उगाच राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो.
जगें अवज्ञाचि करावी। संबंधीं सोयचि न धरावी।
ऐसी ऐसी जीवीं। चाड बहु॥
लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये अशा प्रकारची ज्याच्या जीवामध्ये फार इच्छा असते.
तळौटेपण बाणे। आंगीं हिणावो खेवणें।
तें तेंचि करणें। बहुतकरुनी॥
ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वत:च्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल, त्या त्याच गोष्टी बहुतेक तो करतो.
हा जीतु ना नोहे। लोक कल्पी येणें भावें।
तैसें जिणें होआवें। ऐसी आशा॥
ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही अशी लोक आपल्याविषयी कल्पना करतील अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते.
पै चालतु कां नोहे। कीं वारेनि जातु आहे।
जना ऐसा भ्रमु जाये। तैसें होईजे॥
पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही किंवा वार्‍यानेच जात आहे अशा प्रकारचा आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा तसे आपण व्हावे असे त्यास वाटते.

Manini