एवं हिंसाचि अहिंसा। कर्मकांडीं हा ऐसा।
सिद्धांतु सुमनसा। वोळखें तूं॥
याप्रमाणे हे चांगल्या मनाच्या अर्जुना, हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे, तो तू नीट समजून ठेव.
पहिलें अहिंसेचें नाव। आम्हीं केलें जंव।
तंव स्फूर्ति बांधली हांव। इये मती॥
जेव्हा आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला तेव्हा ही मते सांगावीत अशी स्फूर्तीला हाव झाली.
तरि कैसेनि इयेतें गाळावें। म्हणौनि पडिलें बोलावें।
तेवींचि तुवांही जाणावें। ऐसा भावो॥
तर या मतांना कसे गाळावे? म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले. त्याचप्रमाणे तुलाही निरनिराळी मते माहीत व्हावीत असे हे प्रतिपादन करण्याचा आमचा हेतू होता.
बहुतकरूनि किरीटी। हाचि विषो इये गोठी।
एर्हवी कां आडवाटीं। धाविजैल गा?॥
अर्जुना, बहुतकरून या अहिंसेसंबंधी काही बोलावयास लागले की त्या प्रतिपादनात हाच विषय आढळतो. नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरे सांगण्याच्या आडवाटेला कशाला जावे लागले असते?
आणि स्वमताचिया निर्धारा। लागोनियां धनुर्धरा।
प्राप्तां मतांतरां। निर्वेचु कीजे॥
आणि अर्जुना, आपल्या स्वत:च्या मताच्या निश्चयाकरिता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल त्यांचाही निर्णय केलाच पाहिजे.
ऐसी हे अवधारीं। निरूपिती परी।
आतां ययावरी। मुख्य जें गा॥
याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धत आहे असे समज. आता अर्जुना, यानंतर मुख्य जे.
तें स्वमत बोलिजैल। अहिंसे रूप किजैल।
जेणें उठलिया आंतुल। ज्ञान दिसे॥
ते आमचे मत सांगण्यात येईल. अहिंसेची नीट कल्पना येईल असे लक्षण करण्यात येईल. ही अहिंसा चित्तात प्रगट झाली असता ज्ञान आहे असे दिसेल.
परिइ तें अधिष्ठिलेनि आंगें। जाणिजे आचरतेनि बगें।
जैसी कसवटी सांगे। वानियातें॥
पण ज्याप्रमाणे कसोटी सोन्याच्या कसाला सांगते त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव्य केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा राहत आहे असे जाणले जाते.
तैसें ज्ञानामनाचिये भेटी। सरिसेंचि अहिंसेचें बिंब उठी।
तेंचि ऐसें किरीटी। परिस आतां॥
त्याप्रमाणे ज्ञानामनाच्या भेटीबरोबरच अहिंसेचे चित्र उमटते.