Wednesday, February 12, 2025
HomeमानिनीReligiousSaint Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Saint Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी चंद्रबिंबौनि धारा। निघतां नव्हती गोचरा।
परि एकसरें चकोरां। निघती दोंदें॥
तर चंद्रबिंबातून निघणार्‍या अमृताच्या धारा जरी निघताना डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्ष्यांना एकसारखी दोंदे निघतात.
तैसें प्राणियांसि होये। जरी तो कहींवासु पाहे।
तया अवलोकनाची सोये। कूर्मींही नेणे॥
त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिले तर तसे होते. त्या पाहण्याचा प्रकार कासवीसुद्धा जाणत नाही.
किंबहुना ऐसी। दिठी जयाची भूतांसी।
करही देखसी। तैसेचि ते॥
फार काय सांगावे? याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्याकडे असते व त्याचे जे हात आहेत तेही तसेच आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल.
तरी होऊनियां कृतार्थ। राहिले सिद्धांचे मनोरथ।
तैसे जयाचे हात। निर्व्यापार॥
अहिंसकाची कृती सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन राहतात. म्हणजे सिद्ध पुरुषांचे मन जसे कर्तव्यशून्य झालेले असते. त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात.
अक्षमें आणि संन्यासिलें। कीं निरिंधन आणि विझालें।
मुकेनि घेतलें। मौन जैसें॥
अगोदरच आंधळा, आणखी त्याने पाहण्याचे टाकले अथवा आधीच काष्ठरहित अग्नी आणि पुन्हा तो विझलेला किंवा मुळचाच मुका व त्यात आणखी मौनव्रत घेतलेले.
तयापरी कांहीं। जयां करां करणें नाहीं।
जे अकर्तयाच्या ठायीं। बैसों येती॥
अर्जुना त्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे राहिलेले नाही. कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी ते राहावयास येतात.
आसुडैल वारा। नख लागेल अंबरा।
इया बुद्धी करां। चळों नेदी॥
वार्‍याला झटका बसेल व आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हलू देत नाहीत.
तेथ आंगावरिलीं उडवावीं। कां डोळां रिगतें झाडावीं।
पशुपक्ष्यां दावावीं। त्रासमुद्रा॥
अशी जेथे स्थिती आहे तेथे अंगावर बसलेले माशा, डास वगैरे प्राणी उडवावेत अथवा डोळ्यात जाणारी चिलटे वगैरे झाडून टाकावीत अथवा पशूपक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल असा आविर्भाव आणावा.
इया केउतिया गोठी। नावडे दंडु काठी।
मग शस्त्राचें किरीटी। बोलणें कें?॥
या गोष्टी कुठल्या? त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही. असे जर आहे तर मग अर्जुना हातात शस्त्र घेण्याचे बोलणे कुठले?

Manini