Tuesday, February 11, 2025
HomeमानिनीReligiousAdhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

काइसा वासु कापुरा। मंद जेथ अवधारा।
पिठाचा विकरा। तिये सातें?॥
ऐका जेथे कापराला वास मंद आहे असे म्हणतात त्या बाजारात पिठाची विक्री कशी होईल?
म्हणौनि इये सभे। बोलकेपणाचेनि क्षोभें।
लाग सरूं न लभे। बोला प्रभु॥
म्हणून महाराज या सभेमध्ये बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक मिळणार नाही.
सामान्या आणि विशेषा। सकळै कीजेल देखा।
तरी कानाचेया मुखाकडे न्याल ना तुम्ही॥
सर्वसाधारण अशी अहिंसेची कल्पना व निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसेसंबंधी विशेष कल्पना यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपल्या कानाच्या मुखाकडे नेणार नाही.
शंकेचेनि गदळें। जैं शुद्ध प्रमेय मैळे।
तैं मागुतिया पाउलीं पळे। अवधान येतें॥
शंकारूपी कचर्‍याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो तेव्हा त्या सिद्धांताकडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पावलीच पळेल.
कां करूनि बाबुळियेची बुंथी। जळें जियें ठाती।
तयांची वास पाहाती। हंसु काई?॥
गोंडाळाची खोळ पांघरून जी उदके असतात, त्या उदकाची हंस वाट पाहतात काय?
कां अभ्रापैलीकडे। जैं येत चांदिणें कोडें।
तैं चकोरें चांचुवडें। उचलितीना॥
किंवा ढगामधून ज्या वेळेला चांदणे येते त्या वेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपभोग घेण्याकरिता चकोर पक्षी कौतुकाने आपली चोच सरसावत नाहीत.
तैसें तुम्ही वास न पाहाल। ग्रंथु नेघा वरी कोपाल।
जरी निर्विवाद नव्हैल। निरूपण॥
त्याप्रमाणे जर माझे निरूपण निर्विवाद होणार नाही, तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही. इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवाल.
न बुझावितां मतें। न फिटे आक्षेपाचें लागतें।
तें व्याख्यान जी तुमतें। जोडूनि नेदी॥
निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही.
आणि माझें तंव आघवें। ग्रथन येणेचि भावें।
जे तुम्हीं संतीं होआवें। सन्मुख सदां॥
आणि माझे ग्रंथ रचणे याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न असावे.

Manini