मांडिली गोठी हन मोडैल। वासिपैल कोणी उडैल।
आइकोनिचि वोवांडिल। कोण्ही जरी॥
एखाद्या गोष्टीविषयी आरंभलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल, कोणी घाबरेल, कोणी दचकून उठेल, आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करेल.
तरी दुवाळी कोणा नोहावी। भुंवई कवणाची नुचलावी।
ऐसा भावो जीवीं। म्हणौनि उगा॥
तरी आपल्या बोलण्याने कोणास क्लेश होऊ नये, कोणाची भिवई उचलू नये असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगा असतो.
मग प्रार्थिला विपायें। जरी लोभें बोलों जाये।
तरी परिसतया होये। मायबापु॥
मग आपण बोलावे अशी कोणी प्रार्थना केल्यास तो प्रेमाने बोलायला लागला तर त्याचे बोलणे जे ऐकतात, त्यांना तो आपला आईबापच आहे की काय असे वाटते.
कां नादब्रह्मचि मुसे आलें। कीं गंगापय असललें।
पतिव्रते आलें। वार्धक्य जैसे॥
त्याचे बोलणे जणू नादब्रह्मच आकार धरून आले किंवा गंगेचे पाणीच उसळले अथवा पतिव्रतेला जसे म्हातारपण आले.
तैसें साच आणि मवाळ। मितले आणि रसाळ।
शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे॥
त्याप्रमाणे खरे आणि मऊ मोजके परंतु सरळ, त्याचे बोलणे म्हणजे अमृताच्या लाटाच.
विरोधुवादुबळु। प्राणितापढाळु।
उपहासु छळु। वर्मस्पर्शु॥
उपरोधिक बोलणे, तंट्यास उत्तेजन देणे, प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वाहवणे, टर उडवणे, टाकून बोलणे, वर्मास झोंबणारे शब्द बोलणे.
आटु वेगु विंदाणु। आशा शंका प्रतारणु।
हे संन्यासिले अवगुणु। जया वाचा॥
हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी हे बोलण्यातील दोष आहेत, त्या सर्वांचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो.
आणि तयाचि परी किरीटी। थाउ जयाचिये दिठी।
सांडिलिया भ्रुकुटी। मोकळिया॥
अहिंसकाची दृष्टी आणि त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे व ज्याच्या भिवया मोकळ्या टाकलेल्या आहेत.
कां जे भूतीं वस्तु आहे। तियें रुपों शके विपायें।
म्हणौनि वासु न पाहे। बहुतकरूनी॥
प्राणिमात्रामध्ये वस्तू परब्रह्म आहे. तिला आपली दृष्टी बोचण्याचा संभव आहे म्हणून बहुतकरून तो कोणाकडे पाहत नाही.
ऐसाही कोणे एके वेळे। भीतरले कृपेचेनि बळें।
उघडोनियां डोळे। दृष्टी घाली॥
असाही कोणी एका वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली.