तैसे ते माझें। कलत्र हें जाणिजे।
कायिसेनिही न लजें। तयांचेनि मी॥
त्याप्रमाणे ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे. त्यांचे कोणतेही पडलेले काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही.
जन्ममृत्यूचिया लाटीं। झळंबती इया सृष्टी।
तें देखोनियां पोटीं। ऐसें जाहलें॥
जन्ममृत्यूच्या लाटेत हे जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या पोटात असा विचार आला.
भवसिंधूचेनि माजें। कवणासि धाकु नुपजे।
तेथ जरी कीं माझे। बिहिती हन॥
संसारसागराच्या खवळण्याने कोणास भय उत्पन्न होणार नाही? या योगाने माझे भक्त कदाचित भितील.
म्हणोनि गा पांडवा। मूर्तीचा मेळावा।
करूनि त्यांचिया गांवा। धांवतु आलों॥
म्हणून अर्जुना सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो.
नामाचिया सहस्रवरी। नावा इया अवधारीं।
सजूनियां संसारीं। तारू जाहलों॥
माझी हजारो नावे, याच कोणी नावा तयार करून संसारसागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो असे समज.
सडे जे देखिले। ते ध्यानकासे लाविले।
परीग्रहीं घातले। तरियावरी॥
जे भक्त एकटे आहेत त्यास माझे ध्यानरूपी कासेला लावले व जे कुटुंबवाले त्यांना नामरूपी नावेवर बसवले.
प्रेमाची पेटी। बांधली एकाचिया पोटीं।
मग आणिले तटीं। सायुज्याचिया॥
एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या काठावर आणले.
परी भक्तांचेनि नांवें। चतुष्पदादि आघवे।
वैकुंठींचिये राणिवे। योग्य केले॥
परंतु जे माझे भक्त असे ठरलेले आहेत मग ते चार पायांची जनावरे का असेनात, पण त्या सर्वास वैकुंठाच्या राज्यास योग्य केले.
म्हणोनि गा भक्तां। नाहीं एकही चिंता।
तयांतें समुद्धर्ता। आथि मी सदा॥
म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही. कारण मी त्यांचा उद्धार करण्यास तयार आहे.
आणि जेव्हांचि कां भक्तीं। दीधली आपुली चित्तवृत्ती।
तेव्हांचि मज सूति। त्यांचिये नाटीं॥
आणि जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले.