अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय॥
अथवा हे धनंजया, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला असमर्थ असलास तर अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर.
अथवा हें चित्त। मनबुद्धिसहित।
माझ्यां हातीं अचुंबित। न शकसी देवों॥
अथवा जर मन बुद्धीसह हे चित्त माझ्या हाती अनुच्छिष्ट तू देऊ शकणार नाहीस.
तरी गा ऐसें करीं। यया आठां पाहारांमाझारीं।
मोटकें निमिषभरी। देतु जाय॥
तर अर्जुना, असे कर की आठ प्रहरांमध्ये थोडकेसे निमिषभर चित्त देत जा.
मग जें जें कां निमिख। देखेल माझें सुख।
तेतुलें अरोचक। विषयीं घेईल॥
मग जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहील तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल.
जैसा शरत्कालु रिगे। आणि सरिता वोहटूं लागे।
तैसें चित्त काढेल वेगें। प्रपंचौनि॥
ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला की नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसजसा प्रवेश होईल, त्या मानाने तुझे चित्त प्रपंचापासून वेगाने निघेल.
मग पुनवेहूनि जैसें। शशिबिंब दिसेंदिसें।
हारपत अंवसे। नाहींचि होय॥
मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत अमावास्येला अगदी नाहीसे होते.
तैसें भोगाआंतूनि निगतां। चित्त मजमाजीं रिगतां।
हळूहळू पंडुसुता। मीचि होईल॥
त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता अर्जुना, ते तुझे चित्त हळूहळू मद्रूप होईल.
अगा अभ्यासयोगु म्हणिजे। तो हा एकु जाणिजे।
येणें कांहीं न निपजे। ऐसें नाहीं॥
अरे अभ्यासयोग जो म्हणतात तो हाच आहे असे समज. याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही.
पैं अभ्यासाचेनि बळें। एकां गति अंतराळे।
व्याघ्र सर्प प्रांजळे। केले एकीं॥
अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळीत चालू शकतात व कित्येकांनी वाघ, साप या दुष्ट प्राण्यांनासुद्धा स्वाधीन करून घेतले.