मग म्हणे जाण। तया भक्तांचे लक्षण।
जया मी अंतःकरण। बैसों घालीं॥
मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंत:करण बसावयास देतो, त्या भक्ताची लक्षणे समजून घे.
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः॥
ज्याच्यापासून लोक उद्वेग पावत नाहीत व जो लोकांपासून उद्वेग पावत नाही, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे, तोच मला प्रिय भक्त आहे.
तरी सिंधूचेनि माजें। जळचरां भय नुपजे।
आणि जळचरीं नुबगिजे। समुद्रु जैसा॥
तरी ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणार्या प्राण्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही.
तेवीं उन्मत्तें जगें। जयासि खंती न लगे।
आणि जयाचेनि आंगें। न शिणे लोकु॥
त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वत:कडून लोकांना शीण होत नाही.
किंबहुना पांडवा। शरीर जैसें अवयवां।
तैसा नुबगे जीवां। जीवपणें जो॥
फार काय सांगावे? अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव अशी त्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणिमात्रांना कंटाळत नाही.
जगचि देह जाहलें। म्हणोनि प्रियाप्रिय गेलें।
हर्षामर्ष ठेले। दुजेनविण॥
हे जगत त्याचा देह असल्यामुळे आवडते व नावडते हे भाव त्याच्या चित्तातून गेलेले असतात व त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध यासारखी द्वंद्वे बंद पडलेली असतात.
ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु। भयोद्वेगरहितु।
याहीवरी भक्तु। माझ्यां ठायीं॥
असा सुखादु:खादि द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय व चित्तक्षोभ
यापासून रहित झालेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला.
तरी तयाचा गा मज मोहो। काय सांगों तो पढियावो।
हें असे जीवें जीवो। माझेनि तो॥
तर त्याचा मला मोह असतो. ती आवड मी काय सांगू? हे राहू दे. तो माझ्याच जीवाने जगतो.