जो निजानंदें धाला। परिणामु आयुष्या आला।
पूर्णते जाहला। वल्लभु जो॥
जो आत्मानंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आले, जो पूर्ण ब्रह्मस्थितीरूपी जी स्त्री तिचा प्रिय पती झाला.
अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः।
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः॥
निरपेक्ष, शुद्ध, तत्त्वार्थाचा देखणा, उदासीन, संसारदु:खविरहित, कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार, तद्विरहित असा भक्त प्रिय आहे.
जयाचिया ठायीं पांडवा। अपेक्षे नाहीं रिगावा।
सुखासि चढावा। जयाचें असणें॥
अर्जुना, ज्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहतो.
मोक्ष देऊनि उदार। काशी होय कीर।
परी वेचावें लागें शरीर। तिये गांवीं॥
काशीक्षेत्र जीवांना मोक्ष देण्यात उदार आहे, परंतु त्यामध्ये मुमुक्षूचे शरीर खर्ची पडते.
हिमवंतु दोष खाये। परी जीविताची हानि होये।
तैसें शुचित्व नोहे। सज्जनाचें॥
हिमालय पाप नाहीसे करतो, परंतु मरण्याचा संभव आहे. साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही.
शुचित्वें शुचि गांग होये। आणि पापतापही जाये।
परी तेथें आहे। बुडणें एक॥
गंगोदक पवित्र आहे. त्या गंगोदकाने पाप व ताप नाश पावतात, परंतु गंगोदकात उडी मारण्याची जरुरी असल्याने तेथे बुडण्याचा संभव असतो.
खोलिये पारु नेणिजे। तरी भक्तीं न बुडिजे।
रोकडाचि लाहिजे। न मरतां मोक्षु॥
गंगेप्रमाणेच साधूच्या खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरीही त्याचे संगतीत साधकास बुडण्याची भीती नसते. तेथे मरावयाचा प्रसंग न येता मोक्ष पदरात पडतो.
संताचेनि अंगलगें। पापातें जिणणें गंगे।
तेणें संतसंगें। शुचित्व कैसें॥
संतांच्या शरीरस्पर्शाने गंगेची पापे जातात तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो.
म्हणोनि असो जो ऐसा। शुचित्वें तीर्थां कुवासा।
जेणें उल्लंघविलें दिशा। मनोमळ॥
म्हणून आता हे वर्णन पुरे. याप्रमाणे पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो व ज्याने अज्ञानादि मनातील मळ देशोधडीस लावले.