आणि जयापरौतें कांहीं नाहीं। तें आपणपेंचि आपुल्या ठायीं।
जाहला यालागीं जो कांहीं। आकांक्षी ना॥
आणि ज्यापलीकडे काही नाही असे ब्रह्म ते तो पुरुष आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करीत नाही.
वोखटें कां गोमटें। हें काहींचि तया नुमटे।
रात्रिदिवस न घटे। सूर्यासि जेवीं॥
सूर्याच्या ठिकाणी रात्र-दिवस हे दोन्ही जसे घडत नाही त्याप्रमाणे वाईट व बरे हे त्याला काहीच वाटत नाही.
ऐसा बोधुचि केवळु। जो होवोनि असे निखळु।
त्याहीवरी भजनशीळु। माझ्या ठायीं॥
असा जो केवळ अखंड बोधरूप असून त्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो.
तरी तया ऐसें दुसरें। आम्हां पढियंतें सोयरें।
नाहीं गा साचोकारें। तुझी आण॥
तरी अरे अर्जुना, त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला कोणी नाही, हे तुझी शपथ घेऊन सांगतो.
समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः॥
शत्रू व मित्र, मान व अपमान, शीत व उष्ण, सुख व दु:ख यांचे ठिकाणी समान असणारा संगरहित.
पार्था जयाचिया ठायीं। वैषम्याची वार्ता नाहीं।
रिपुमित्रां दोहीं। सरिसा पाडु॥
अर्जुना ज्याच्या ठिकाणी मनाच्या वाकडेपणाची गोष्ट नाही. शत्रू व मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे.
कां घरींचियां उजियेडु करावा। पारखियां आंधारु पाडावा।
हें नेणेचि गा पांडवा। दीपु जैसा॥
अथवा घरच्या माणसांना उजेड व परक्या माणसांना अंधार पाडावा हे जसे दिव्याला माहीत नाही.
जो खांडावया घावो घाली। कां लावणी जयानें केली।
दोघां एकचि सावली। वृक्षु दे जैसा॥
जो तोडण्याकरिता घाव घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांना वृक्ष जशी सारखी सावली देतो.
नातरी इक्षुदंडु। पाळितया गोडु।
गाळितया कडु। नोहेंचि जेवीं॥
ज्याप्रमाणे ऊस त्याच्या पिकास पाणी घालून वाढवणारास गोड व चरकात घालून गाळणारास कडू असा कधी असत नाही.