Sunday, January 5, 2025
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

अरिमित्रीं तैसा। अर्जुना जया भावो ऐसा।
मानापमानीं सरिसा। होतु जाये॥
अर्जुना, त्याप्रमाणे शत्रू-मित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिती मानापमानावेळी सारखीच असते.
तिहीं ऋतूं समान। जैसें कां गगन।
तैसा एकचि मान। शीतोष्णीं जया॥
तिन्ही ऋतूंमध्ये आकाश जसे सारखे, त्याप्रमाणे थंड, उष्ण द्वंद्वांची त्याच्याजवळ सारखीच किंमत असते.
दक्षिण उत्तर मारुता। मेरु जैसा पंडुसुता।
तैसा सुखदुःखप्राप्तां। मध्यस्थु जो॥
दक्षिण आणि उत्तर दिशेकडील वार्‍यामध्ये जसा मेरू पर्वत अचल, तसा प्राप्त होणारी जी सुखदु:खे, त्यामध्ये तो अचल असतो.
माधुर्यें चंद्रिका। सरिसी राया रंका।
तैसा जो सकळिकां। भूतां समु॥
चांदणे आपली मधुरता राजा व रंक यांना सारखीच अनुभवण्यास देते, तसा जो सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी सारखा असतो.
आघवियां जगा एक। सेव्य जैसें उदक।
तैसें जयातें तिन्ही लोक। आकांक्षिती॥
पाणी सर्व जगाला एकच सेव्य आहे, त्याप्रमाणे ज्या भक्ताची स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करतात.
जो सबाह्यसंग। सांडोनिया लाग।
एकाकीं असे आंग। आंगीं सूनी॥
जो अंतर्बाह्य संगाचा संबंध सोडून जीवस्वरूपाचा ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी असतो.
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः॥
निंदा व स्तुती समान मानणारा, मौनी, संतोष वृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय न धरणारा, स्थिर बुद्धी असलेला भक्तिमान मनुष्य मला प्रिय आहे.
जो निंदेतें नेघे। स्तुति न श्लाघे।
आकाशा न लगे। लेपु जैसा॥
जो निंदेने खिन्न व स्तुतीने चढत नाही, ज्याप्रमाणे आकाशाला रंगाचा लेप लागणे शक्य नाही.
तैसें निंदे आणि स्तुति। मानु करूनि एके पांती।
विचरे प्राणवृत्ती। जनीं वनीं॥
त्याप्रमाणे निंदा व स्तुती यांचा त्याच्या मनावर परिणाम होत नाही. त्यामुळे तो निंदा व स्तुती यांना सारखाच मान देऊन प्राणासारख्या उदास वृत्तीने लोकांमध्ये व रानामध्ये संचार करतो.

- Advertisment -

Manini