साच लटिकें दोन्ही। बोलोनि न बोले जाहला मौनी।
जो भोगितां उन्मनी। आरायेना॥
खरे व खोटे ही दोन्ही बोलून न बोलल्यासारखी असल्यामुळे तो मौनी झाला आहे. कारण की तो उन्मनी अवस्था भोगत असता त्यास पुरेसे वाटत नाही. (तो एकसारखा उन्मनी अवस्था भोगत असतो).
जो यथालाभें न तोखे। अलाभें न पारुखे।
पाउसेवीण न सुके। समुद्रु जैसा॥
जो ज्या वेळेला जे मिळेल त्याने हर्षित होत नाही व ज्याप्रमाणे समुद्र पावसावाचून सुकत नाही त्याप्रमाणे काहीही न मिळाले तरी जो खिन्न होत नाही.
आणि वायूसि एके ठायीं। बिढार जैसें नाहीं।
तैसा न धरीच कहीं। आश्रयो जो॥
आणि ज्याप्रमाणे वायू हा कोठेतरी एकच जागा धरून राहत नाही त्याप्रमाणे जो कोठेही आश्रय धरत नाही.
आघवाची आकाशस्थिति। जेवीं वायूसि नित्य वसती।
तेवीं जगचि विश्रांती। स्थान जया॥
ज्याप्रमाणे आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्य वस्ती आहे, त्याप्रमाणे संपूर्ण जग हे ज्याचे विश्रांतिस्थान आहे.
हें विश्वचि माझें घर। ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर। आपण जाहला॥
हे विश्वच माझे घर आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो. फार काय सांगावे! सर्व स्थावर-जंगमात्मक जग जो अनुभवाच्या अंगाने आपणच बनला आहे.
मग याहीवरी पार्था। माझ्या भजनीं आस्था।
तरी तयातें मी माथां। मुकुट करीं॥
अर्जुना, इतके असूनही आणखी ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी उत्सुकता असते, तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो.
उत्तमासि मस्तक। खालविजे हें काय कौतुक।
परी मानु करिती तिन्ही लोक। पायवणियां॥
उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे? पण उत्तम भक्तांच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते.
तरी श्रद्धावस्तूसी आदरु। करितां जाणिजे प्रकारु।
जरी होय श्रीगुरु। सदाशिवु॥
जर श्रीशंकर गुरू होतील तरच भक्तितत्त्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल.