परी हे असो आतां। महेशातें वानितां।
आत्मस्तुति होतां। संचारु असे॥
पण आता हे शंकराचे वर्णन पुरे. कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखे होते.
ययालागीं हें नोहे। म्हणितलें रमानाहें।
अर्जुना मी वाहें। शिरीं तयातें॥
एवढ्याकरिता हे बोलणे नको असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना, मी त्याला डोक्यावर वाहतो.
जे पुरुषार्थसिद्धि चौथी। घेऊनि आपुलिया हातीं।
रिगाला भक्तिपंथीं। जगा देतु॥
कारण की तो भक्त चौथी पुरुषार्थसिद्धी जो मोक्ष, तो आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देत निघाला आहे.
कैवल्याचा अधिकारी। मोक्षाची सोडी बांधी करी।
कीं जळाचिये परी। तळवटु घे॥
तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असा असतो, म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो. (म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा व कोणाला न द्यावा हे ठरवतो). इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असा असतो.
म्हणोनि गा नमस्कारूं। तयातें आम्ही माथां मुगुट करूं।
तयाची टांच धरूं। हृदयीं आम्हीं॥
म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू. त्याला आम्ही डोक्यावर मुकुट करू व त्याची टाच आम्ही हृदयावर धारण करू.
तयाचिया गुणांचीं लेणीं। लेववूं अपुलिये वाणी।
तयाची कीर्ति श्रवणीं। आम्हीं लेवूं॥
त्याच्या या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू. आम्ही आपल्या वाचेने आता त्याचे गुण गाऊ. त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आपल्या कानात घालू.
तो पहावा हे डोहळे। म्हणोनि अचक्षूसी मज डोळे।
हातींचेनि लीलाकमळें। पुजूं तयातें॥
तो पाहावा ही आम्हाला इच्छा होते म्हणून आम्ही डोळेरहित आहोत तरी डोळे घेतो आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करीत असतो.
दोंवरी दोनी। भुजा आलों घेउनि।
आलिंगावयालागुनी। तयाचें आंग॥
त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरिता दोन हातांवर आणखी दोन हात घेऊन आलो. म्हणजे आम्ही चतुर्भुज रूप धारण केले आहे.