परी निरूपली जैसी। तैसीच स्थिति मानसीं।
मग सुक्षेत्रीं जैसी। पेरणी केली॥
पण ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली, त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर तशा मनात हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे.
परी मातें परम करूनि। इयें अर्थीं प्रेम धरूनि।
हेंचि सर्वस्व मानूनि। घेती जे पैं॥
परंतु जे प्राप्त करून घेण्याला योग्य असे श्रेष्ठ ठिकाण आहे, असे मला समजतात व भक्तितत्वाविषयी आपले मनात प्रेम बाळगून व हेच आपले सर्व भांडवल आहे अशी समजूत ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात.
पार्था गा जगीं। तेचि भक्त तेचि योगी।
उत्कंठा तयांलागीं। अखंड मज॥
अगा अर्जुना, या जगात तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते.
तें तीर्थ तें क्षेत्र। जगीं तेंचि पवित्र।
भक्ति कथेसि मैत्र। जयां पुरुषां॥
तेच तीर्थ, तेच क्षेत्र, जगात तेच पवित्र की ज्या पुरुषांचा भक्तिकथेशी स्नेह असतो.
आम्हीं तयांचें करूं ध्यान। ते आमुचें देवतार्चन।
ते वांचूनि आन। गोमटें नाहीं॥
आम्ही त्याचे ध्यान करून तो आमची पूज्य देवता आहे. त्याच्यावाचून आम्ही दुसरे काही चांगले मानत नाही.
तयाचें आम्हा व्यसन। ते आमुचें निधिनिधान।
किंबहुना समाधान। ते मिळती तैं॥
त्याचे आम्हास व्यसन असते व तोच आमच्या ठेव्याची खाण आहे. फार काय सांगावे? तो आम्हास भेटेल तेव्हाच आम्हास समाधान वाटते.
पैं प्रेमळाची वार्ता। जे अनुवादती पंडुसुता।
ते मानूं परमदेवता। आपुली आम्ही॥
परंतु अर्जुना, जे प्रेमळ पुरुष भक्तांची कथा गातात, ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो.
ऐसे निजजनानंदें। तेणें जगदादिकंदें।
बोलिलें मुकुंदें। संजयो म्हणे॥
आपल्या भक्तांचा जो खरा आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे, तो मुकुंद (श्रीकृष्ण) याप्रमाणे आता बोलला.